राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
परीक्षा संपल्यावर घरात आनंदी वातावरण असते. मुलांना मोकळा वेळ खूप असतो आणि या मोकळ्या वेळेचे काय करायचे, असा गहन प्रश्न पालकांना पडतो, मुलांना नाही. पण रिझल्टची तारीख जवळ येऊ लागली, की काही घरांत ताण निर्माण होऊ लागतो. याला दोन कारणं असतात. एक, पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा असतात. दोन, काही बाबतीत मुलंच पालकांना जुमानत नसल्यानं पालक आधीच त्रस्त झालेले असतात. मग रिझल्ट घेऊन मूल घरी आलं, की ‘त्या त्रस्तपणाचा’ उद्रे क होतो. हे कसं टाळता येईल हे जरा समजून घेऊया.
मिळालेले मार्क आणि खर्च केलेले पैसे यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणं सर्वस्वी चुकीचं आहे. उदाहरणार्थ, ‘तुला तू सांगशील तो महागातला क्लास/शिकवणी लावली. त्यासाठी अमुक तमुक पैसे खर्च केले; पण काय फायदा झाला? तुझे मार्कच वाढत नाहीत. गेले ना सगळे पैसे पाण्यात? तुला पैसे कमवायची अक्कल नाही; पण गमवायची आहे!’ वगैरे वगैरे.
क्लास किंवा शिकवणीवर भरपूर पैसे खर्च केल्यानं मुलांचे मार्क वाढत नाहीत. शिक्षकानं मुलाची शिकण्याची गती समजून घेतली आणि त्याप्रमाणे शिक्षकानं त्याच्या अध्यापन पद्धतीत बदल केला, तर मुलाचे मार्क वाढण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे मार्क न वाढणं, अभ्यास न करणं याबाबत मुलांना दूषणं देण्यापेक्षा मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं अधिक महत्त्वाचं आहे. जेव्हा पालक किंवा शिक्षक प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवरून मुलांना टोचत राहतात, ‘तुला हे करायला नको.. तुला ते करायला नको.. तू काहीच करत नाहीस’ अशी ‘नन्नाची मात्रा’ उगाळत बसतात, तेव्हा मुलांचा आत्मसन्मान दुखावला गेल्यानं मुलं बंडखोरी करतात. काहीवेळा निगरगट्ट होतात आणि या सगळ्याचा स्फोट मुलानं घरात रिझल्ट आणल्यावर होतो.
मुलानं रिझल्ट घरी आणल्यानंतर प्रथम पालकांनी सकारात्मक भूमिका घेणं आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा, जर तुमच्या मुलाला कमी मार्क मिळाले असतील, तर त्याला फक्त तुमचाच मुलगा जबाबदार असतो असं नाही. कमी मार्क मिळाले म्हणजे तो ‘ढ’ आहे असं तर अजिबात नाही. मार्क कमी किंवा जास्त हे सापेक्ष आहे. म्हणून मार्कांची तुलना करताना इतर कुणाच्या मार्कांशी किंवा तुमच्या स्वप्नातल्या मार्कांशी तर अजिबातच करू नका. मागच्या परीक्षेत मिळालेले मार्क आणि आत्ता मिळालेले मार्क यांतील तफावत ‘समजून’ घ्या.
‘जे काही आहे, ते आनंदानं स्वीकारण्याची तयारी’ ही सकारात्मकतेची पहिली पायरी. समजा मागील परीक्षेतील मार्कापेक्षा यावेळी कमी मार्क मिळाले आहेत, अशा वेळी मुलावर डाफरून, ओरडून त्याचे मार्क वाढत नाहीत. अशा वेळी मुलाला विश्वासात घ्या. ‘मार्क का कमी मिळाले असतील? कुठला भाग समजला नाही असं वाटतं? तुला तो अडचणीचा भाग नीट समजावा म्हणून आपण कुणाची मदत घेऊ शकतो? तुझ्याप्रमाणे मलाही वाटतं, की तुला अधिक मार्क मिळायला हवे होते; पण हरकत नाही. आपण मिळून प्रयत्न करू, पुढच्या वेळी यापेक्षा जास्त मार्क मिळवू. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत. मला खात्री आहे पुढच्यावेळी तू यापेक्षा चांगलं यश मिळवशील...’ असं त्याच्याशी बोला आणि पाहा चमत्कार होतो की नाही.
अपयशाच्या वेळी खांद्यावर हात ठेवून धीर देणारे पालक मुलांना हवे असतात. मुलांमध्ये ‘तू यशस्वी होशील’ अशी उमेद जागवणारे पालक मुलांना हवे असतात. रिझल्टच्या दिवशी घरातलं वातावरण निर्भय असेल ‘याची खात्री असेल’, तरच मुलं पुढच्या काळात घवघवीत यशस्वी होतात.
रिझल्टच्या दिवशी घरातलं वातावरण गढूळ असण्याची ‘खात्री असेल’, तर मुलं घराकडे न वळता, आपल्या जिवाचं बरं-वाईट करण्याकडे वळतात.
‘सुजाण पालक नेहमीच मुलांच्या यशात आणि अपयशात भागीदार होतात’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.