Latest Marathi News Updates : भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर
esakal April 19, 2025 01:45 PM
Sangram Thopte : भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू

भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजप वाटेवर आहेत. भोर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत ते संवाद साधत आहेत. आज मुळशी तालुक्यातील काही गावात बैठका घेणार आहेत, तर उद्या भोर तालुक्यात मेळावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, संग्राम थोपटे उद्या संध्याकाळी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि 21 किंवा 22 एप्रिलला भाजप प्रवेश करु शकतात.

Magadh University LIVE : मगध विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर 'ईडी'चे आरोपपत्र

नवी दिल्ली : बिहारमधील मगध विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेकायदा संपत्ती बाळगल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह त्यांचा मुलगा डॉ. अशोक कुमार, भाऊ अवधेश प्रसाद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. येथील ‘प्यारी देवी मेमोरिअल वेल्फेअर ट्रस्ट’चाही या हेराफेरीशी संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Kolhapur News : संविधानाच्या सन्मानासाठी कोल्हापुरात उद्या मिरवणूक

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित क्रांतिसूर्य जोतिराव फुले, डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (ता. २०) संविधानाच्या सन्मानार्थ विविध चित्ररथांसहित मिरवणूक निघणार आहे. दुपारी चार वाजता बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौकमार्गे पुन्हा बिंदू चौकात मिरवणूक येईल. तिथेच सायंकाळी सहा वाजता चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. सुकुमार कांबळे यांची सभा होईल. समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन साळे प्रमुख उपस्थित असतील. जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य अध्यक्षस्थानी असतील. सभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजीराव नाईक, अविनाश शिंदे, आर. एस. दीक्षांत, सुकुमार कोठावळे, उषा गवंडी आदींनी केले आहे.

JEE Main Result 2025 : परिक्षार्थींना मोठा दिलासा! सत्र 2 चा निकाल जाहीर

JEE Main 2025 सत्र 2 चा निकाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केला आहे. JEE अर्थात जॉइंट एंट्रन्स एग्झामिनेशन मध्ये सहभागी झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. उमेदवारांना आपले गुण आणि स्कोअरकार्ड पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट  वर भेट द्यावी लागेल.

Mustafabad Building Collapses : दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये कोसळली इमारत, चार जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती

दिल्ली : दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज पहाटे मुस्तफाबाद परिसरात एक इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. श्वान पथके, एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.

Udaysinh Undalkar LIVE : उदयसिंह उंडाळकरांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आज (शनिवार) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोरेगाव, सातारा व कऱ्हाड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यास अजितदादा उपस्थित राहतील. रात्री साडेआठ वाजता ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

Ajara Sugar Factory : आजरा कारखाना अध्यक्षपद निवडीसाठी आज कोल्हापुरात मुलाखती

आजरा : आजरा साखर कारखाना अध्यक्षपद निवड मंगळवारी (ता. २२) होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ संचालकांच्या मुलाखती शनिवारी (ता. १९) घेणार आहेत. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Beed Crime LIVE : वकील महिलेस मारहाण; सरपंचासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज (जि. बीड) : ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्यासंदर्भात तक्रार केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील सनगावचे सरपंच अनंत रघुनाथ अंजान याच्यासह दहा जणांनी गावातील वकील महिलेस काठ्या, रबरी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना चौदा एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. मारहाणीसंदर्भातील छायाचित्रे गुरुवारी (ता. १७) समाज माध्यमांवर समोर आल्यानंतर सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला.

Ranjit Kasale LIVE : फौजदार रणजित कासले अखेर बडतर्फ; ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी

Latest Marathi Live Updates 19 April 2025 : सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:च्या घरी बाथरूममध्ये डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १८) सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली आहे. तसेच निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजीत कासले याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी बडतर्फीची कारवाई केली असून ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्याला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली. ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्यासंदर्भात तक्रार केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील सनगावचे सरपंच अनंत रघुनाथ अंजान याच्यासह दहा जणांनी गावातील वकील महिलेस काठ्या, रबरी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना चौदा एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे ‘नीट पीजी २०२५’ ही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.