सोलापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याची तक्रार आणि पारंपरिक वीज कनेक्शनवरील वाढता ताण यावर उपाय म्हणून महावितरणकडून आता दिवसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेतूनच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ऑनलाइन अर्ज केल्यानंतर याचा कार्यवाही केली जाणार आहे.
महावितरणच्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेतून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान दिले जाते तर एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान आहे. दरम्यान, राज्यात पारंपरिक कृषीपंपाचे ९० एक कोटींपर्यंत कनेक्शनधारक आहेत. दरवर्षी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी नियमित वीजबिल भरत नसल्याने आठ-दहा वर्षातील शेतकऱ्यांकडील शेतीपंपाची थकबाकी ६० हजार कोटींवर पोचली. त्यामुळे महावितरणला कर्ज काढून वीजनिर्मितीचा खर्च भागवावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आता शेतीपंपासाठी नवीन पारंपारिक कनेक्शन न देण्याची भूमिका महावितरणने घेतली. आता ज्या शेतकऱ्यांना नवीन कृषीपंपाचे कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांना मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनेअंतर्गत https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून कनेक्शन घेता येणार आहे. त्यानंतर एका महिन्यात हे कनेक्शन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘सौर कृषीपंप’ योजनेचे अनुदान
अडीच एचपी : अडीच एकरासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कनेक्शनसाठी १० टक्के हिस्सा (२२,९७१ रुपये) तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाच टक्के हिस्सा (११,४८६ रुपये) भरावा लागतो.
पाच एचपी : पाच एकरासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर पॅनल उभारून कृषीपंपाचे कनेक्शन घेण्यासाठी ३२ हजार ७५ रुपये (१० टक्के) तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना १६ हजार ६८ रुपये (५ टक्के) भरावे लागतात.
साडेसात एचपी : पाच एकरावरील मागासवर्गीय शेतकऱ्यांना २२ हजार ६५ रुपये (५ टक्के) तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ४४ हजार ९३९ रुपये (१० टक्के) भरून सौर कनेक्शन घेता येईल.
२५ वर्षे वीजबिलापासून मुक्ती देणारी योजना
मागेल त्याला सौर कृषीपंप योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा, रात्री दोन्हीवेळी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होते. २५ वर्षे सौरपॅनेल टिकत असल्याने तेवढी वर्षे वीजबिल येत नाही. दुसरीकडे पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती मोफत आहे. योजनेमुळे आता पारंपरिक वीजेचे नवीन कृषीपंपांना कनेक्शन देणे बंद करण्यात आले आहे.
- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर