नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ होणे गरजेचे आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविताना महापालिकेकडून ‘रिक्वेस्ट फॉर क्वॅलिफिकेशन’च्या माध्यमातून कामे देण्यास सुरुवात केली असून, त्याचा मसुदाही प्रसिद्ध केला आहे. मात्र, सुरुवातीला एक हजार ३७४ कोटी रुपयांचे मलजल शुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम असताना आता तेच काम एक हजार ६३६ कोटी रुपयांपर्यंत पोचत आहे.
विशेष म्हणजे अशा प्रकारचे काम देताना पुढील २५ वर्षांसाठी मक्तेदाराकडे हा प्रकल्प देखभाल- दुरुस्तीसाठी दिला जाणार असल्याने पुढील २५ वर्षांपर्यंत मासिक १५७ कोटी रुपये महापालिकेला संबंधित कंपनीला द्यावे लागणार आहे. महापालिकेकडे निधी नसताना शासनाकडून निधी का मिळत नाही? महापालिकेला व्यवहार परवडेल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ होणे गरजेचे आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही गोदावरीचे पाणी स्वच्छ नसल्याचे यापूर्वीच सांगितल्यानंतर नदी स्वच्छ करण्यासाठी मलनिस्सारण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी हालचाली अधिक गतिमान झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मापदंडानुसार मल जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्याबरोबरच नवीन केंद्रांची निर्मिती करण्यासाठी एक हजार ३७४ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र सदर निधी शासनाकडून थेट न मिळता महापालिकेच्या माध्यमातून पुढील २५ वर्षांसाठी काही ठेकेदारांना देखभाल-दुरुस्तीचे काम देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या कामासाठी रिक्वेस्ट फार क्वॉलिफिकेशन मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सुरुवातीला एक हजार ३७४ कोटी रुपयांचे काम आता एक हजार ६३६ कोटी रुपयांपर्यंत पोचले आहे. सदरचे काम करताना शासनाकडून निधी अपेक्षित आहे. मात्र महापालिकेकडे निधी नसल्याने पुढील २५ वर्षांसाठी काही ठेकेदारांना देऊन त्याद्वारे मलनिसारण व्यवस्था उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या कामाचे दोन ठराव महासभेत झाले आहे. पहिला ठरव ११ फेब्रुवारी २०२५, तर दुसरा सुधारित ठराव ११ मार्च २०२५ ला करण्यात आला आहे. कामात पारदर्शकता अपेक्षित असताना मागच्या दाराने ठरवू का मंजूर झाले याबद्दल देखील संशय व्यक्त केला जात आहे.
चांदशी, जलालपूरच्या पाण्यावर प्रक्रिया
महापालिका हद्दीला लागून असलेल्या चांदशी व जलालपूर या ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेथील सांडपाणीही महापालिकेच्या लाइनला जोडून त्यावर प्रक्रिया करण्याचाही समावेश करण्यात आला. वास्तविक, महापालिकेला हद्दीबाहेर कामे करता येत नाहीत. असे असतानाही चांदशी व जलालपूर ग्रामपंचायतींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी शुद्ध होणे गरजेचे आहे; परंतु गोदावरीचे शुद्धीकरण करताना कामात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. तशी पारदर्शकता महापालिकेच्या कामात दिसून येत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री व नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
- प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिवसेना