नाशिक- पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना कुशल मजुरीची रक्कम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून दिली जाते. जिल्ह्यात ९३१ घरकुलांची कामे सुरू असल्यामुळे ‘मनरेगा’च्या मजुरांची संख्या ५१ हजारांवर पोहोचल्याने या विभागाला ‘अच्छे दिन’ आले आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एका कुटुंबाला वर्षातील शंभर दिवसांच्या कामाची हमी दिली आहे. त्यामुळे एका मजुराच्या अथवा जॉबकार्ड असलेल्या संबंधित कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित पहिल्या शंभर दिवसांतील कामाची मजुरी केंद्र सरकारकडून मिळते. राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यक्षेत्र वगळता सर्व ‘मनरेगा’ योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. रस्ते, विहिरी, पाझर तलाव, जमिनीची बांधबंदिस्ती (नालाबडिंग), फळबाग लागवड, घरकुले आदी विविध कामे रोजगार हमी योजनेतून केली जातात. रब्बी हंगामातील शेतीची कामे आटोपली असून, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
इतर कामांची मजुरी थकली
३१ मार्चला एक हजार ३९६ ग्रामपंचायतींत ३१ कामे सुरू होती. यावर ३२४ मजूर कामे करत होती. १७ एप्रिलला जिल्ह्यातील एक हजार ३९६ ग्रामपंचायतींतर्गत ९३१ कामे सुरू आहेत. त्यावर ५१ हजार १०८ मजूर कामे करत आहेत. या सर्व कामांत सर्वाधिक कामे घरकुलांची आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत इतर कामांची मजुरी केंद्र सरकारकडे थकली आहे. मात्र, घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाल्याने ही कामे जिल्ह्यात वेगाने सुरू आहेत.