लवळे येथे मंगळवारी
आंतरराष्ट्रीय परिषद
पिरंगुट, ता. १८ : लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार (ता. २२) व बुधवारी (ता.२३) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. रिसेंट अॅडव्हान्सेस इन इंजिनिअरिंग अँड सायन्सेस’ या विषयावर ही परिषद सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महाविद्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली.
भारती विद्यापिठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परिषदेत डॉ. हेनरी स्टीफन श्रेकर (फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रीओ ग्रँडे डू सुल, ब्राझील), डॉ. इम्रे फेल्डे (ओबुदा युनिव्हर्सिटी, हंगेरी), डॉ. जे. व्ही. रमना रेड्डी (टोहोकू युनिव्हर्सिटी, जपान) तसेच डॉ. अनुराग श्रीवास्तव (लिंकन युनिव्हर्सिटी, मलेशिया) आदी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत.
या परिषदेला भारतातील विविध राज्यांतील संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंध मोठ्या प्रमाणावर सादर केले जात आहेत. यासोबतच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सहभाग लक्षणीय ठरत आहे. प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले, ‘‘परिषदेमुळे तांत्रिक क्षेत्रातील नवकल्पना, संशोधन व ज्ञानाची देवाणघेवाण प्रभावीपणे साध्य होईल. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडले जाईल.’’