Phule Movie: 'चित्रपटात फक्त ऐतिहासिक सत्य...'; 'फुले' चित्रपट वादावरुन दिग्दर्शकांची भूमिका, म्हणाले- ट्रेलरवरूनच...
Saam TV April 19, 2025 10:45 PM

Phule Movie: सामाजिक सुधारक ज्योतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या हिंदी चित्रपटावर सध्या वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ब्राह्मण समाजाच्या प्रतिमेबाबत आक्षेप घेण्यात आले असून, काही ब्राह्मण संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चित्रपटात कोणतीही अतिशयोक्ती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महादेवन यांनी सांगितले की, "चित्रपटात फक्त ऐतिहासिक सत्य दाखवले आहे. ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. चित्रपटात कोणत्याही समाजाची बदनामी करण्याचा हेतू नाही." त्यांनी हेही नमूद केले की, "चित्रपट पाहिल्यानंतरच त्यावर मत बनवावे, ट्रेलरवरून निष्कर्ष काढू नये."

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधी ११ एप्रिल २०२५ अशी निश्चित करण्यात आली होती, परंतु वादामुळे ती २५ एप्रिल २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी ज्योतीराव आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती डान्सिंग शिवा फिल्म्स, किंग्समेन प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे.

अनंत महादेवन यांनी सांगितले की, "फुलेंनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या, यामुळे आजही त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. चित्रपटात त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे आणि कोणत्याही समाजाविरुद्ध द्वेष पसरवण्याचा हेतू नाही." त्यांनी हेही नमूद केले की, "चित्रपटात काही ब्राह्मणांनी फुले दांपत्याला मदत केली असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला आहे.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.