MI vs CSK Playing XI IPL 2025 : 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?
GH News April 20, 2025 07:08 PM

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईचं रविवारी 20 एप्रिलला विजयी हॅटट्रिकवर लक्ष असणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असणार आहे. उभयसंघातील हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई टीम कमबॅकसाठी ओळखली जाते. त्यामुळे यंदाही चाहत्यांना पलटणकडून अशीच अपेक्षा आहे. मुंबईची या मोसमात निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतर मुंबईने सलग 2 सामने जिंकले.

मुंबईने दिल्ली कॅपिट्ल्सला त्यांच्याच घरात पराभूत केलं. मुंबईने दिल्लीवर 12धावांनी विजय मिळवला. तर त्यानंतर पलटणने सनरायजर्स हैदराबादवर 4 विकेट्सने विजय साकारला. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचाही विजयी होऊन प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. सीएसके ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे.

गेल्या सामन्यात चेन्नई विजयी

मुंबई विरुद्ध चेन्नई या दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 23 मार्चला चेन्नईच्या नूर अहमदने मुंबईच्या बॅटिंगला सुरुंग लावला होता. नूरने 4 विकेट्स घेतल्या होत्या. मुंबईने 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. तर चेन्नईने 156 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. त्यामुळे पलटणकडे या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्सवर वरचढ राहिली आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात एकूण 38 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी सर्वाधिक 20 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला 18 सामन्यांमध्ये जिंकता आलं आहे. मुंबईची चेन्नईविरुद्ध 219 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तर चेन्नईने मुंबईविरुद्ध 218 धावा केल्या आहेत.

मुंबई आणि चेन्नईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रयान रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट आणि दीपक चाहर.

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिवम दुबे, शेख रशीद, राहुल त्रिपाठी, जेमी ओवरटन, रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा, विजय शंकर, अंशुल कंबोज, नूर अमहद आणि खलील अहमद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.