Sundar Pichai IPL tweet : राजस्थान रॉयल्सकडून काल १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने आयपीएलमध्ये पदार्पण करत इतिहास रचला. याबरोबरच तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडूही ठरला. या सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जैस्वालबरोबर ८५ धावांची भागीदारी रचली. वैभवने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सर्वांनाच थक्क केलं.
वैभवच्या कामगिरीनंतर आता सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होतं आहे. इतकचं काय तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही वैभवच्या खेळीचं कौतुक केलं आहे. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. आठवीत शिकणाऱ्या तरुण पोराचा खेळ पाहण्यासाठी मी झोपेतून उठलो, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील वैभवने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत रॉब क्विनी, आंद्रे रसेल, आणि महेश थीक्षणा या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं. वैभवने २० चेंडूत ३४ धावांची खेळी केली. यावेळी त्याने २ षटकार आणि तीन चौकारही लगावले. महत्त्वाचे म्हणजे त्याने यशस्वी जायस्वालसोबत ८५ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजवली. मात्र, ३४ धावांवर असताना अवेश खानने त्याला बाद केलं.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?डावखुरा फलंदाज वैभवने १२ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाविरुद्धच्या सामन्यात वैभवला भारतीय संघात स्थान देण्यात आले होतं. येथे त्याने फक्त ५८ चेंडूत शतक ठोकून एक नवा विक्रम रचला होता. जो भारतीय अंडर-१९ क्रिकेटमधील सर्वात जलद शतक होते.
बिहारच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ च्या लिलिवात इतिहास रचला. १३ व्या वर्षी निवड झालेला तो युवा खेळाडू ठरला. १२ वर्ष व २८४ दिवसांचा असताना त्याने रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले आणि बिहारसाठी एवढ्या कमी वयात पदार्पण करण्याचा मान त्याने पटकावला. १३ वर्ष व २६९ दिवसांचा असताना त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हाही पराक्रम करणारा तो युवा भारतीय ठरला.