नवी मुंबईत महाविकास आघाडीला खिंडार
उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी पवार गट, काँग्रेसचे पदाधिकारी शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार
वाशी, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबईतील शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज राजकीय नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, मंगळवारी (ता. २२) रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जवळजवळ १२ माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटात जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. गत पाच वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. दिवाळीनंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. पालिकेच्या निवडणुकीमध्ये पॅनेल होण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. त्यामुळे पॅनेलमध्ये आपला निभाव लागण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार हे कोलंटउड्या मारण्यास सुरुवात करीत आहेत. सत्तेबरोबर राहण्यासाठी अनेक विरोधी पक्षांतील उमेदवार सोयीचे राजकारण साधत विविध पक्षांत प्रवेश करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका कोमल वास्कर, रतन मांडवे व माजी नगरसेविका पत्नी सुनीता मांडवे, उबाठा गटाचे शहरप्रमुख काशिनाथ पवार, उबाठा गटाचे माजी नगरसेवक रंगनाथ औटी, भारती कोळी तसेच तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाथ लाड, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे आदी सर्वजन मंगळवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शहरभर याबाबतचे फलक झळकत असून, या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.