घरांचे दर कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे
वाशी, ता. २० (वार्ताहर) : सिडकोच्या घरांचे वाढीव दर कमी करावेत, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या सिडको सोडतधारकांच्या लढ्याला आता वेग मिळाला आहे. २६ हजार घरांच्या किंमती कमी कराव्यात, या मागणीसाठी ३२ सदस्यीय कोअर कमिटीने नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा येथील दरे गावातील निवासस्थानी भेट दिली. या वेळी सिडको घराचे दर कमी करण्याची मागणी सदस्यांनी शिंदे यांच्याकडे केली.
यापूर्वी सोडतधारकांनी विविध मंत्री, आमदार, खासदार व सिडको अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली होती. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी आक्रमक आंदोलनेही झाली, मात्र घरांचे दर कमी करण्याबाबत सिडको प्रशासन व राज्य शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने सोडतधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, पुष्टीकरण रक्कम भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिडको सोडतधारकांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी घरांच्या दरात कपात करण्याची विनंती केली. या मुद्द्यावर तत्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले. तसेच दरवाढीच्या पुनरावलोकनाची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देशही दिले. यासोबतच सिडको सोडतधारक सुमीत साठे, प्रद्न्या रावळ, महेश शेगर यांच्यासह अन्य विजेत्यांना विजय सिंघल यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या सकारात्मक घडामोडींमुळे सिडको घरांच्या दरात लवकरच कपात होण्याची आशा सर्व सोडतधारकांमध्ये निर्माण झाली आहे.