उल्हास नदीचा श्वास गुदमरला
esakal April 21, 2025 03:45 AM

उल्हास नदीचा श्वास गुदमरला
ठाण्याची जलजीवन वाहिनी धोक्यात
संकेत सबनीस/ मोहिनी जाधव
कल्याण/बदलापूर, ता. २० : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह अनेक गावपाड्याला पाणीपुरवठा करणारी उल्हास नदीचा श्वास प्रदूषणाने गुदमरत आहे. नदी बचाव मोहिमेपासून ते आता कृती आराखड्यापर्यंत नदी स्वच्छतेसाठी अनेक अभियान राबवण्यात आले. शेकडो कोटींचा निधी खर्च केला, पण किनारपट्टीवर वाढते नागरीकरण, त्यातून येणारे सांडपाणी, रासायनिक कारखान्यांचे टाकाऊ रासायन, माती-कचऱ्याच्या भरावामुळे प्रदूषणाची मगरमिठी सुटत नसल्याचे वास्तवही आहे. त्यामुळे रोज जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांची तहान भागवणारी आणि अनेक उपनद्यांची जननी असलेली ठाण्याची जलजीवन वाहिनी धोक्यात आली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर मुंबईतील मिठीच्या मार्गावर उल्हास नदीची दशा होण्यास वेळ लागणार नाही. किंबहूना नदीची गटारगंगा बनण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमलेल्या जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाने ‘पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी’नुसार हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये देशभरातील ६०३ नद्यांचे विश्लेषण केले होते. यापैकी ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७९ नद्यांमधील ३११ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक ५५ प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात असून, उल्हास नदी प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या पाच क्रमांकावर आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी जीवनदायिनी म्हणून उल्हास नदी ओळखली जाते. जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे व नदीकिनारच्या ३५ ते ४० गावांना पिण्याचे पाणी याच नदीतून मिळते, पण सध्या या नदीच्या पात्राची अवस्था दयनीय झाली आहे. गावा-गावांतील सांडपाणी, नजीकच्या कारखान्यांचे सांडपाणी, घाण, कचरा, निर्माल्य, प्लॅस्टिक, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, हे सारं काही उल्हास नदीत मिसळत आहे. यामुळे नदीच्या पाण्याचा वास आणि चवही बदलली आहे. गेल्या काही वर्षांत शहरीकरण, विकासाची धोरणे, स्थलांतर या सगळ्या कारणांमुळे उल्हास नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. उल्हास नदीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. पाण्याचे प्रदूषण वाढल्याने उल्हास नदीवर अनेक ठिकाणी जलपर्णीने झडप घातली आहे. त्यामुळे नदीचा श्वास आणखीनच गुदमरत चालला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांपैकी कोकणातील सर्वात मोठी नदी म्हणजे ‘उल्हास’. उल्हास नदी सुमारे १४० किलोमीटरचा प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळते. या खोऱ्याचे विस्तार क्षेत्र ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक व मुंबई जिल्ह्यांमध्ये आहे. याचे एकूण क्षेत्रफळ साधारणपणे ४,५०० चौ. किलोमीटर आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील लोणावळा येथून उगम पावणारी उल्हास नदी पुढे कर्जत, नेरळ, वांगणी, ही गावे करत बदलापूर शहराला येऊन या नदीचे खोरे मोठे आढळते. पुढे अंबरनाथ, उल्हासनगर अशी शहरे करत ही नदी कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. बदलापूरजवळ बारवी, मुरबाडी मलंगगड डोंगररांगांतून उगम पावणारी वालधुनी, पुढे भातसा आणि काळू आणि मलंगगडाच्या पश्चिम भागातून उगम पावणारी देसाई या नद्या टप्प्याटप्प्यावर उल्हास नदीला येऊन मिळतात. हीच उल्हास नदी या उपवाहिन्यांचा प्रवास करत पुढे कल्याणच्या खाडीत विलीन होते.

कल्याणच्या खाडीतून पुढे उल्हास नदीचा प्रवास हा ठाण्याजवळ येताच ही नदी दोन प्रवाहात विभागली जाते. यातील एक प्रवाह घोडबंदर, दहिसर, वसई असा करत अरबी समुद्राला मिळतो, तर दुसरा प्रवाह शिवडीमार्गे अरबी समुद्रात विलीन होतो. असा हा समृद्ध प्रवास करणाऱ्या या उल्हास नदीची वाढत्या प्रदूषणाने आता पुरती दैना झाली आहे. २०२३ मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

कुठे, किती प्रदूषित
उल्हास नदीच्या मार्गात प्रदूषणाचे अनेक ‘अड्डे’ येतात. कोणतीही प्रक्रिया न करता हे प्रदूषण उल्हास नदीच्या खोऱ्यात जैसे थे सोडले जाते. दररोज ५० मोठ्या नाल्याद्वारे लाखो लिटर सिवेज मलमूत्र व एमआईडीसीद्वारे ३४ एमएलडी रासायनिक केमिकल मिळून दररोज ६०० एमएलडी प्रदूषणकारी सांडपाणी उल्हास नदीत सोडले जात आहे. या प्रदूषणात हातभार लावणारे प्रमुख क्षेत्र आणि प्रदूषित सांडपाणी पुढीलप्रमाणे.

- कर्जत- ५० एमएलडी
- नेरळ-माथेरान पालिका- ५० एमएलडी
- कुळगांव बदलापूर नगरपालिका- ६० एमएलडी
- उल्हासनगर महापालिका- ९० एमएलडी
- कल्याण-डोंबिवली महापालिका - २१५ एमएलडी
- भिवंडी महापालिका- ११० एमएलडी

प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष
- शेलू, वांगणी या परिसरापासून उल्हास नदीचे प्रदूषण स्पष्ट डोळ्यांनी दिसून येते. बदलापूर शहरात जुवेली, मानकिवली, खरवई, शिरगाव या परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्राबाहेरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मोठमोठ्या कंपन्या कार्यान्वित आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे बदलापुरात दुर्लक्ष होत असल्याने रात्री, पहाटे, दुपारच्या वेळेस किंवा कधी कधी पूर्ण दिवसभर त्या कंपन्यांतील रासायनिक पाणी कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जाते. हा नाला उल्हास नदीत जाऊन मिळतो.

- बदलापूर गावाच्या दिशेने जाणाऱ्या पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या वाहिन्यांवर गाडी धुणे, अंघोळ, निर्माल्य टाकण्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत नालेदेखील उल्हास नदीला येऊन मिसळतात.

- अंबरनाथ शहरातील शिवमंदिर परिसरातून वाहत कानसई भागातून वाहत जाऊन पुढे ही नदी उल्हासनगर रेल्वेस्थानक पश्चिम भागातून वाहते, मात्र अगदी अंबरनाथ कानसई भागातून वाहत असताना त्या ठिकाणी असलेले रासायनिक कारखाने, जीन्सचे कारखाने, शिवमंदिरातील निर्माल्य आणि अंतर्गत वस्तीतून येणारे नाले नदीला मिळत असल्याने अंबरनाथ शहरापासून पुढे उल्हासनगरपर्यंत या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

उल्हासनगरात नाल्यात रूपांतर
उल्हासनगर रेल्वेस्थानकावरून पश्चिमेकडील भागात जात असताना एक पूल ओलांडून जाताना नाकावर रुमाल धरावा लागतो, कारण पुलाखालून वाहणाऱ्या नाल्याच्या घाणीची मोठी दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरलेली असते, मात्र हा नाला नसून ती उल्हास नदी आहे, हे लक्षात आल्यावर आपण जलाशयातील या समृद्धीच्या लयास कारणीभूत ठरत आहोत, याची जाणीव होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.