राजकीय अस्थिरतेला तोंड देत असलेला बांगलादेश एकीकडे देशांतर्गत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे तर दुसरीकडे परराष्ट्र धोरणावर काम करतो आहे.
भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण होत असताना कधीकाळी शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी बांगलादेश पावलं टाकतो आहे.
दोन्ही देशांना याची आवश्यकता का वाटते आहे? बांगलादेश आणि पाकिस्तानात नेमकं काय चाललं आहे? याबद्दल जाणून घेऊया.
बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील बैठक नियमितपणे घेतली जावी असं ठरलं होतं. मात्र यंदा ही बैठक जवळपास 15 वर्षांनी झाली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांनी गुरुवारी (17 एप्रिल) ढाक्यात बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीमउद्दीन यांची औपचारिक बैठक घेतली. त्याशिवाय त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्रविषयक बाबींचे सल्लागार आणि मुख्य सल्लागारांच्यादेखील स्वतंत्रपणे भेटी घेतल्या.
दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात झाल्यानंतर ही पहिलीच औपचारिक बैठक होती. त्यात दोन्ही देशांमधील 'न सुटलेल्या ऐतिहासिक प्रश्नां'बाबत चर्चा झाली. तसंच दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवरही देखील चर्चा झाली.
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशीमउद्दीन यांनी सांगितलं की, बांगलादेशनं पाकिस्तानकडे स्वांतत्र्यापूर्वीच्या नुकसान भरपाईपोटी 4.32 अब्ज म्हणजे 432 कोटी डॉलर देण्याची मागणी केली आहे. आमना बलोच यांच्याबरोबरची बैठक संपल्यानंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीत बांगलादेशनं मागणी केली की, 1971 मध्ये जेव्हा दोन्ही देश एकच होते. त्यावेळी संयुक्त संपत्तीमधून पाकिस्ताननं बांगलादेशच्या वाट्याचे 4.3 अब्ज डॉलर (36 हजार कोटी रुपये किंवा 52 हजार कोटी टका) द्यावेत.
त्याचबरोबर बांगलादेशनं म्हटलं आहे की, 1970 मध्ये चक्रीवादळ आलं होतं. तसंच तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशला मदतीपोटी 20 कोटी डॉलर (जवळपास 2400 कोटी टका) मिळाले होते. पाकिस्ताननं ते पैसेही द्यावेत.
दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती लक्षात घेता, स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं दिलेल्या आकडेवारीनुसार 4 एप्रिलला पाकिस्तानकडे 15.75 अब्ज डॉलरचा परकी चलनसाठा होता.
म्हणजे बांगलादेशची मागणी पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला सध्याच्या त्यांच्या परकी गंगाजळीच्या एक चतुर्थांशहून अधिक भाग द्यावा लागेल.
याशिवाय बैठकीत, 1971 च्या बांगलादेश मुक्तियुद्धाच्या वेळेस पाकिस्तानं बांगलादेशात केलेल्या अत्याचारांची औपचारिकपणे माफी मागण्याचा मुद्दादेखील बांगलादेशकडून मांडण्यात आला.
बांगलादेशनं कोणत्या न सुटलेल्या प्रश्नांची चर्चा केलीबांगलादेशच्या मुक्तीयुद्धाचा इतिहास, पूर्व पाकिस्तानच्या काळापासून बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंधांशी अविभाज्यपणे जोडलेला आहे.
बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर देखील दोन्ही देशांमधील अंतर्गत राजकारण आणि द्विपक्षीय राजनैतिक व्यूहरचनेच्या बाबतीत वारंवार या इतिहासाची चर्चा होत आली आहे.
गुरुवारी (17 एप्रिल) परराष्ट्र सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत बांगलादेशनं दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी न सुटलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीमउद्दीन म्हणाले की, "या बैठकीत अविभाजित संपत्तीचं समान वाटप, इथे अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांचं प्रत्यर्पण, 1970 मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी परदेशातून आलेली रक्कम देणं आणि 1971 मध्ये तत्कालीन पाकिस्तानी सैन्यानं सामूहिकपणे केलेल्या हत्यांची उघडपणे माफी मागण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली."
ते पुढे म्हणाले, "बांगलादेशचा पहिला अंदाज 400 कोटी डॉलरचा होता. तर दुसरा अंदाज 432 कोटी डॉलरचा होता. मी परराष्ट्र सचिवांबरोबर झालेल्या बैठकीत या रकमेचा उल्लेख केला आहे."
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव म्हणाले की, "इथे (बांगलादेश) अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पर्याय दिल्यावर काहीजणांना बांगलादेशातच राहायचं आहे तर काहींना पाकिस्तानात परत जायचं आहे."
"बांगलादेशात याप्रकारे जवळपास 3, 24, 447 म्हणजे जवळपास सव्वा तीन लाख पाकिस्तानी नागरिक अडकलेले आहेत."
जशीमउद्दीन यांच्या मते, "पाकिस्ताननं या न सुटलेल्या समस्यांवर चर्चा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे."
बांगलादेश कल पाकिस्तानकडे आहे का?पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांच्या या दौऱ्यांच्या भू-राजकीय महत्त्वाबद्दल देखील कुतुहल दिसून येतं आहे.
भारताऐवजी आता बांगलादेशचा कल पाकिस्तानकडे आहे का? पत्रकारांनी हा प्रश्न विचारल्यावर बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीमउद्दीन म्हणाले, "पाकिस्तानबरोबर बांगलादेशचे संबंध सध्या जसे आहेत, त्यांना अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांमधील न सुटलेल्या प्रश्नांना सोडवणं आवश्यक आहे."
पाकिस्तान आणि बांगलादेशात थेट विमानसेवा सुरू होण्याचा उल्लेख करत ते म्हणाले, "एखाद्या देशाचे लोक जेव्हा दुसऱ्या देशात जातात, त्याला त्या देशाकडे कल आहे असं म्हणता येणार नाही."
"एकमेकांबद्दल सन्मान आणि परस्पर हित हाच आमचा पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचा पाया आहे. यात आम्ही आमच्या हिताच्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत."
त्याचं म्हणणं होतं की, मुत्सद्देगिरीचं काम आपली भूमिका स्पष्ट करणं आणि त्यानुसार पुढील वाटचाल करणं असतं. पाकिस्ताननं म्हटलं आहे की, या मुद्द्याबाबत ते भविष्यातदेखील चर्चा सुरू ठेवू इच्छितात.
परराष्ट्र सचिव जशीमउद्दीन म्हणाले, "दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सातत्य राखण्यासाठी 27 आणि 28 एप्रिलला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत."
मोहम्मद युनूस यांचं संबंध दृढ करण्याचं आवाहनबांगलादेशातील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी व्यापाराच्या संधी तपासून पाहण्यासाठी पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखी दृढ करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.
बांगलादेशच्या राष्ट्रीय वृत्तससंस्थेनं (बीएसएस) सांगितलं आहे की गुरुवारी (17 एप्रिल) राष्ट्रीय अतिथी गृहात पाकिस्तानाच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मुख्य सल्लागारांनी हे आवाहन केलं.
या वृत्तसंस्थेनुसार, मोहम्मद युनूस म्हणाले, "काही अडचणी नक्कीच आहेत. मात्र त्यावर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधावे लागतील."
दुसऱ्या बाजूला आमना बलोच म्हणाल्या, "बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विविध शक्यतांचा लाभ घेण्याच्या मार्गांचा आम्हाला शोध घ्यावा लागेल."
वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, मुख्य सल्लागारांबरोबर झालेल्या बैठकीत आमना बलोच म्हणाल्या, "आमच्याकडे एक मोठी प्रादेशिक बाजारपेठ आहे. आम्ही याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. प्रत्येक वेळेस आम्ही ही संधी गमावू शकत नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.