बडतर्फ रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ, न्यायालयातून बाहेर पडताना ‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांच
Marathi April 21, 2025 08:25 PM

रणजित कास्ले: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या एन्काउंटरचा कट रचल्याचा आरोप करणारी व थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बोट ठेवणारी एक चित्रफीत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjit Kasle) याने समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी रणजित कासलेला पुण्यातून (Pune) अटक करण्यात आली होती. तर कासले विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात रणजित कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज सोमवारी (दि. 21) रणजित कासलेला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी रणजित कासलेच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कारण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरू आहे. विशेषतः कासलेच्या मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा रिकव्हर करणे आणि त्याने वापरलेले वाहन ताब्यात घेणे गरजेचे असल्याने पोलिसांनी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांच लक्ष

विशेष बाब म्हणजे, कासलेला कोर्टातून बाहेर नेत असताना त्याने पुन्हा एकदा दोन्ही हातांनी ‘व्हिक्टरी साइन’ दाखवली. याआधीच्या सुनावणीवेळीही त्याने अशाच प्रकारे व्हिक्टरी साइन केल्याचे दिसून आले होते. आता रणजीत कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता न्यायालयात पुढील सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रणजीत कासले विरोधात तीन गुन्हे दाखल

दरम्यान, धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेविरोधात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाईतील व्यापारी सुधीर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कासलेने आईच्या उपचारासाठी म्हणून सहा लाख रुपये उसने घेतले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही त्यांनी ते पैसे परत न केल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रणजीत कासले आणि सुधीर चौधरी यांच्यात अंबाजोगाई येथे कासले कार्यरत असताना मैत्री झाली होती. या नात्यावर विश्वास ठेवून चौधरी यांनी आर्थिक मदत केली होती. मात्र पैसे परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गेल्या काही दिवसांत कासलेविरोधात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी त्याच्यावर परळी आणि अंबाजोगाई येथे गुन्हे दाखल आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

मोठी बातमी : रणजीत कासलेला निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती, प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर, प्रकरणाला वेगळं वळण?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.