बोस्टन : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे. ही निवडणूक घेणारी प्रणालीच संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडली असून या प्रणालीमध्ये काही तरी गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येते असे त्यांनी म्हटले आहे. ते येथे आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
राहुल म्हणाले की, आता महाराष्ट्रातीलच विधानसभा निवडणुकीचे उदाहरण घ्या! काही क्षणांमध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये अचानक मोठी वाढ झाली. भाजपने मात्र त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. राहुल यांना ‘चाइल्ड सिंड्रोम’ हा मानसिक आजार असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.
‘‘महाराष्ट्रामध्ये प्रौढांची जेवढी संख्या आहे त्यापेक्षा अधिक लोकांनी मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये साधारणपणे ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येते. ही पूर्णपणे अशक्यप्राय बाब आहे. हेच गणित जर विचारात घेतले तर प्रत्येकी एका मताला तीन मिनिटांचा कालावधी खर्च होणे अपेक्षित आहे. याच हिशोबाने सर्व मतदान केंद्रे ही साधारणपणे दुसऱ्या दिवसाच्या पहाटे दोन वाजेपर्यंत उघडी राहायला हवी होती. प्रत्यक्षात तसे काहीच घडलेले नाही. आम्ही या सगळ्या प्रक्रियेची ध्वनचित्रफित मागितली तेव्हा त्यांनी केवळ नकारच दिला नाही तर त्यासाठी थेट कायद्यामध्येच बदल केला,’’ असे राहुल यांनी नमूद केले. तत्पूर्वी राहुल यांनी याआधी फेब्रुवारीत झालेल्या पत्रकारपरिषदेमध्ये नेमका हाच मुद्दा उपस्थित केला होता.
राहुल यांचे येथे शनिवारी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आगमन झाल्यानंतर ते रविवारी बोस्टन येथील कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या दौऱ्यामध्ये ते परदेशस्थ भारतीय विद्यार्थी आणि तज्ज्ञांशी देखील संवाद साधणार आहेत.
राहुल गांधींनी परदेशामध्ये जाऊन भारताची आणि येथील लोकशाही व्यवस्थेची बदनामी केली आहे. त्यांच्याकडून सातत्याने अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. पक्षाचा सातत्याने निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो. विरोधी पक्ष नेते असताना ते आपल्याच देशाची परदेशामध्ये बदनामी करत फिरत आहेत. यामुळे ते नेमका कोणाचा अजेंडा चालवीत आहे असा संशय लोकांच्या मनात निर्माण होतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अनेक निवडणुकांमध्ये पराभव होऊन देखील काँग्रेस पक्षाने काहीच धडा घेतलेला दिसत नाही. ते सातत्याने निवडणूक आयोग, मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करत आहेत. परदेशामध्ये जाऊन येथील निवडणूक प्रक्रियेबाबत तिथे बोलणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.
- अनुराग ठाकूर, भाजपचे नेते