ते मुंबईतल्या लँड स्कॅमचे…बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप!
GH News April 22, 2025 05:15 PM

Ashish Shelar Criticizes Uddhav Thackeray : कोणत्याही क्षणी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई पालिका काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून आता मुंबई शहरातील समस्यांवर राजकीय नेते प्राथमिकतेने बोलायला लागले आहेत. मुंबईतील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याच घाट घातला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून नेहमी केला जातो. आता मात्र हाच धागा पकडून भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लँड स्कॅमचा बादशाहा म्हणत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

उद्धव ठाकरे लँड स्कॅमचे बादशाहा

भाजपाने नुकतेच गरवारे क्लब येथे एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपाकडून या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना “मुंबईतील सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचे बादशाहा उद्धव ठाकरे आहेत. म्हणून त्याच्या डोक्यात लँड आणि लँड स्कॅम सुरू असतं,” असा सणसणाटी आरोप शेलार यांनी केलाय.

बिल्डरांना जमिनी देण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलं

तसेच, बीजेपीवाले जमिनी घेतील आणि अदाणी, अंबानी यांना देतील अशी टीका उद्धव ठाकरे करतायत. मुंबईत 1 स्क्वेअर फुटची किंमत 1 लाख रुपये आहे. मुंबई पोलिकेवर तुमची 25 वर्षे सत्ता होती. मुंबईतील जमीन बिल्डरांना देण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलं आहे,” असा हल्लाबोल शेलार यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न का विचारत आहेचय कोणतीही जागा बिल्डरला जाणार नाही, हे मी आताच सांगतोय, असंही शेलार यांनी ठणकावून सांगितलं.

उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार?

दरम्यान, मुंबई पालिका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली असताना आता शेलार यांनी उद्धव ठाकरेंना थेट लँड माफिया म्हटलं आहे. त्यामुळे आता शेलार यांच्या या आरोपांवर ठाकरे यांचा पक्ष नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.