Pope Francis : मानवतावादी, समानतेचे पाईक
esakal April 22, 2025 07:45 PM

मानवतावादी, समानतेचे पाईक असणारे पोप फ्रान्सिस यांनी धर्माच्या नावाने भेदभाव न करण्याची शिकवण दिली. मानद बिशप थॉमस डाबरे यांनी त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

का र्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लियो हे पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव. संत फ्रान्सिस यांच्या शिकवणुकीचा मोठा पगडा त्यांच्यावर असल्याने त्यांनी पुढे फ्रान्सिस हे नाव घेतले. पोप फ्रान्सिस नावानेच ते ओळखले जात. २०१३ मध्ये त्यांची बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. युरोपबाहेरचे ते पहिले पोप ठरले. २६६ व्या पोप पदावर त्यांची निवड झाल्याने तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. पोप यांनी कॅथॉलिक ख्रिस्तसभेला आपल्या अधिकारात एक आगळीवेगळी दिशा दाखवली. त्यांनी आपल्या कार्यकाळात औपचारिकतेला थारा दिला नव्हता.

रोमन कॅथॉलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनी अनेक चांगल्या सुधारणा अमलात आणल्या. त्यात मुख्य म्हणजे धर्माच्या नावाने घेण्यात येणाऱ्या भूमिकेला त्यांनी कायम विरोध केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक नव्या प्रथा सुरू केल्या. येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे गुरू असूनही १२ शिष्यांचे पाय धुतले होते त्याप्रमाणे पोप यांनी १२ लोकांचे पाय धुण्याची प्रथा सुरू केली.

त्यात त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. एवढेच नव्हे; तर त्यांनी तुरुंगातील लोकांचेही पाय धुतले. त्यांना भारताबद्दल आस्था होती. भारतात असलेली गरिबी आणि येथील शिक्षण यावर चर्चने काम करावे, असे त्यांचे सांगणे होते. ते महात्मा गांधी यांच्या शांततेच्या विचाराचे समर्थक होते. जगात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य आणि दुसऱ्याच्या मताचा आदर केल्याशिवाय जगात शांतता नांदणार नाही, अशी त्यांची धारणा होती.

(शब्दांकन ः

संदीप पंडित)

पर्सन ऑफ द इअर

२०१३ मध्ये पोप फ्रान्सिस हे टाइम मासिकद्वारा ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून घोषित होणारे पहिले पोप होते. त्यांची विनयशीलता, सामान्य लोकांविषयी आस्था, स्नेह, रुग्णांशी संवाद साधणे, सामाजिक न्यायासाठी लढणे यात त्यांचा सहभाग असल्याने ते लोकांचे पोप म्हणून ओळखले जाऊ लागले. पोप फ्रान्सिस हे फुटबॉलचे चाहते होते आणि ते अर्जेटिनाच्या सॅन लॉरेना फुटबॉल क्लबचे समर्थक होते.

नाव : जॉर्ज मारियो बर्गोग्लियो

जन्म : १७ डिसेंबर १९३६ , ब्युनस आयर्स, अर्जेंटिना त्यांचे पालक इटलीतून स्थलांतरित झालेले होते आणि वडील रेल्वेमध्ये नोकरी करत असत. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली आणि काही काळ प्रयोगशाळेत कामही केले.

१९६९ : त्यांची पाद्री म्हणून नियुक्ती.

१९७३ : त्यांची जेसुईट ऑफ अर्जेटिना या संघटनेचे प्रांतीय प्रमुख म्हणून नियुक्ती.

१९९२ : ते बिशप झाले आणि १९९८ मध्ये ब्युनस आयर्सचे आर्चबिशप.

२००१ : त्यांना कार्डिनल घोषित करण्यात आले. यामुळे ते पोपपदासाठी संभाव्य उमेदवार ठरले.

१३ मार्च २०१३ : २६६ वे पोप म्हणून त्यांची निवड झाली व त्यांनी नाव घेतलं पोप फ्रान्सिस. ते पहिले अर्जेंटिनियन पोप. पहिले ‘जेसुइट’ विचारसरणीचे पोप आणि पहिले दक्षिण अमेरिकन पोप ठरले.

९ फेब्रुवारी २०२५ : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि अस्थमामुळे समुदायास उपदेश करण्यात ते असमर्थ

फेब्रुवारी ते मार्च २०२५ : रुग्णालयात ३८ दिवस उपचार

२१ एप्रिल २०२५ : वयाच्या ८८ व्या वषी पोप फ्रान्सिस यांचे निधन.

पोप फ्रान्सिस हे मोकळ्या मनाचे आणि परंपरावादी होते. ते सुधारणांचे समर्थक होते आणि आंतरधर्मीय संवादाचे उत्कट पुरस्कर्ते होते. पर्यावरणाबद्दलची त्यांची चिंता आणि मानवी तस्करीविरुद्धचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. अधिक समजुतीचे त्यांचे आवाहन त्यांच्या अनुयायांना प्रेरणा देत राहील. दिल्ली आणि वॉशिंग्टन येथे झालेल्या जागतिक संस्कृती महोत्सवात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी संदेश घेऊन त्यांचे दूत पाठवले होते.

- श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते

निधनाचे वृत्त

पोप यांचे निधन झाल्याबाबतची तपासणी डॉक्टरांनी केल्यावर चर्चचे मुख्य प्रशासक त्याबाबतचे अधिकृत निवेदन प्रसिद्ध करतात. ही बातमी रोमच्या चर्चचे प्रमुख जगाला सांगतात. जगभरातील कार्डिनलना हेच पाचारण करतात.

दुखवटा

पोप यांच्या निधनाचा दुखवटा नऊ दिवस चालतो. निधनाच्या दिवशी शवाला लाल कपडे घातले जातात. शवाशेजारी पोप यांचा दंड ठेवला जातो. दुसऱ्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत हे शव सेंट पीटर्स बॅसिलिका येथे ठेवले जाते.

कॉन्क्लेव्ह

नव्या पोपची निवड करण्यासाठी दिवस निश्चित केल्यानंतर दोन तृतीयांश बहुमताने निवड होईपर्यंत सकाळच्या वेळेत दोन वेळेस आणि संध्याकाळी दोन वेळेस मतदान घेतले जाते. ही मतदानप्रक्रिया नऊ कार्डिनलच्या नेतृत्वाखाली होते. मतदान करणारा प्रत्येक कार्डिनल एका टेबलवर ठेवलेल्या भांड्यामध्ये मतपत्रिका टाकतो. मतपत्रिका टाकण्यापूर्वी ठरलेली शपथ घेतली जाते. या प्रक्रियेवर देखरेख ठेवणारा कार्डिनल भांडे गोल फिरवून मतपत्रिकांची सरमिसळ करतो. मतपत्रिका आणि मतदार यांची संख्या न जुळल्यास सर्व मतपत्रिका जाळल्या जातात आणि प्रक्रिया पुन्हा राबविली जाते. भांड्यात पडलेल्या मतपत्रिका तीन कार्डिनल मिळून तपासतात आणि मतदाराने पसंत केलेल्या कार्डिनलचे नाव मोठ्याने पुकारतात. सर्व मतपत्रिका एका दोऱ्यात ओवून ठेवून दिल्या जातात.

बहुमत न झाल्यास

मतदानात दोन तृतीयांश मतांनी निवड न झाल्यास मतपत्रिका जाळून टाकत पुन्हा मतदान घेतले जाते. सलग तीन दिवस दररोज चार वेळा मतदान प्रक्रिया घेऊनही एका नावावर बहुमत न झाल्यास प्रक्रिया काही काळ थांबविली जाते. नंतर सात वेळा मतदान घेतले जाते. यातही बहुमत न झाल्यास आणखी दोन टप्प्यांत सात वेळा मतदान घेतले जाते. या टप्प्यांमध्येही दोन तृतीयांश बहुमत न झाल्यास साध्या बहुमताने पोपची निवड केली जाते.

चिमणीतून धूर

मतदानाचा निकाल जाहीर करण्यासाठी तीन कार्डिनलची नियुक्ती केली जाते. हे कार्डिनल प्रत्येक फेरीतील मतदानाच्या निकालाचे जाहीर वाचन करतात. जर एखाद्या उमेदवाराला अपेक्षित दोन-तृतीयांश मते मिळाली नाहीत, तर मतपत्रिका जाळल्या जातात. यासाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो, त्यातून काळा धूर निघतो. याउलट एखाद्या उमेदवाराला एखाद्या फेरीत दोन तृतीयांश मते मिळतात, तेव्हा हा निकाल मान्य आहे का, हे ‘कॉलेज ऑफ कार्डिनल’च्या डिनला विचारले जाते. जर त्यांना हा निकाल मान्य असला तर अंतिम फेरीतील मतपत्रिका जाळतात. पण त्यासाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो, त्यातून पांढरा धूर निघतो. यामुळे नव्या पोपची निवड झाल्याचे सर्वांना समजते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.