आयपीएलच्या 18 व्या मोसमात सोमवारी 21 एप्रिलला शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला. गुजरातने केकेआरवर त्यांच्याच घरच्या मैदानात एकतर्फी मात केली. गुजरातने केकेआरला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 159 धावाच करता आल्या. गुजरातला 39 धावांच्या फरकाने सामना जिंकल्याने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला. गुजरातने यासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तसेच गुजरातसह एकूण 5 संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
गुजरातने केकेआरचा धुव्वा उडवत आपलं पहिलं स्थान आणखी भक्कम केलं. गुजरात टायटन्स टीमने 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुजरातच्या खात्यात 12 गुण आहेत. तसेच गुजरातचा नेट रनरेट हा +1.104 असा आहे. त्यामुळे गुजरातला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी फक्त आणखी 2 सामनेच जिंकायचेच आहेत. त्यामुळे गुजरातचा प्लेऑफचा मार्ग जवळपास मोकळा झालाय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघानी 7 सामने खेळले आहेत. तर इतर 8 संघांनी प्रत्येकी 8 सामने खेळले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या पाचात गुजरातनंतर दिल्ली, आरसीबी पंजाब आणि लखनौचा समावेश आहे. या चारही संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या 4 संघांमध्ये पुढील काही सामन्यांत जोरदार चुरस पाहायला मिळणार, यात शंका नाही.
मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. मुंबईची या मोसमात 50-50 अशी कामगिरी राहिली आहे. मुंबईने 8 पैकी एकूण 4 तर सलग 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईला प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवायचं असेल तर सातत्य कायम ठेवावं लागेल.
गुजरात टायटन्स नंबर 1
गुजरातविरुद्ध 39 धावांच्या मोठ्या फरकाने सामना गमावल्यानंतर केकेआरच्या नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. केकेआर पराभवानंतरही सातव्या स्थानीच आहेत. मात्र केकेआरचा नेट रनरेट हा +0.212 असा झालाय. त्यानंतर राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या 3 संघांची वाईट स्थिती झाली आहे. राजस्थान आणि चेन्नईने 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकले आहेत. तर हैदराबादने 7 पैकी 5 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामन्यांतच विजयी होता आलं आहे. राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई हे तिन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.