(Rajkot Shivaji Maharaj Statue) जळगाव : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 1 मे रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी, यंदा जरा ‘चांगल्या’ हातांनी अनावरण व्हावे अशी आमची मागणी असल्याचा टोला लगावला आहे. याआधी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 04 डिसेंबर 2023ला अनावरण करण्या आले होते. पण अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती, हे उल्लेखनीय. (Rajkot Shivaji Maharaj Statue: Rohini Khadse taunts BJP regarding the unveiling of the statue)
राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यापूर्वीचा शिवपुतळा 28 फूट उंचीचा होता. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील 60 फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची 93 फुट असेल. शिवरायांच्या हातातील तलवार 23 फुटांची असून चबुतऱ्याची उंची 3 मीटर असेल. या पुतळ्याच्या कामासाठी 31 कोटी 75 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टीलमध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा आणि पायाच्या कामासाठी एम 50 हे हायग्रीड काँक्रिट वापरण्यात आले आहे. आता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी या नव्या पुतळ्याचे अनावर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.
हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti : शिक्षक गणवेशाच्या ‘टेंडरबाजीत’ दलाली खाण्याची स्पर्धा लागेल, ठाकरेंचा आरोप
मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त 04 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र, वर्षभरातच (26 ऑगस्ट 2024) हा पुतळा कोसळला होता. त्यामुळे या पुतळा उभारण्याच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर तिथे नव्याने पुतळा उभारण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर एनसीपी एसपीच्या रोहिणी खडसे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभा राहत आहे आणि काही दिवसात या पुतळ्याचे अनावरण होईल, ही आनंदाची बाब आहे. मात्र, यंदा जरा ‘चांगल्या’ हातांनी अनावरण व्हावे अशी आमची मागणी आहे. मागच्या वेळी अवघ्या सहा महिन्यांत महाराजांचा पुतळा पडल्याची घटना महाराष्ट्र अजून विसरलेली नाही. तिथे फक्त शिवबांचा पुतळा पडला नव्हता तर महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Harshwardhan Sapkal : जनता आर्थिक अडचणीत, सत्तासूर पंचतारांकित सुविधात… सपकाळांचा हल्लाबोल