Gold Price: ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे सोन्याचे भाव 1 लाख नाही तर आणखी वाढणार; नेमकं काय म्हणाले?
esakal April 22, 2025 08:45 PM

Gold Prices Cross Rs 1 Lakh: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत मंदीची शक्यता वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः हे मान्य केले आहे. त्यांनी अमेरिकन फेड रिझर्व्हच्या अध्यक्षांवर टीका केली आणि म्हटले की जर व्याजदर कमी केले नाहीत तर अमेरिकेत मंदी येईल. मंदीच्या विधानानंतर, असे दिसते की सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात.

भारतापासून अमेरिकेपर्यंत, सोन्याच्या किमतीत इतकी वाढ झाली आहे की ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकन बाजारात सोन्याची किंमत 3,500 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे, तर दुसरीकडे, भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत 1,900 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. वायदा बाजारात सोन्याच्या किमती 1 लाख रुपयांवर पोहचल्या आहेत.

सोन्याच्या किमतीत वाढ

देशातील फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये किमतीत प्रचंड वाढ दिसून येत आहे. व्यापार सत्रादरम्यान, सोन्याच्या किमतीत 1,900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 1 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्याचे भाव 1 लाख नाही तर आणखी वाढणार

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या वर पोहोचला आहे. याचे एक कारण म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाचा परिणाम सध्या बाजारात दिसून येत आहे. याशिवाय, जगातील अनेक देशांमध्ये टॅरिफचा धोका स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचा भाव 1 लाखांच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?
  • आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची मागणी वाढते. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

  • ट्रम्प यांनी सांगितले की, व्याजदरात तातडीने कपात करण्याची गरज आहे. अन्यथा अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता आहे. त्यांनी यूएस फेड चेअर जेरोम पॉवेलवर टीका केली, त्यांचे मत आहे की ट्रम्पच्या टॅरिफ योजनांमुळे महागाईत वाढ होणार नाही हे स्पष्ट होईपर्यंत व्याजदर कायम राहिले पाहिजेत.

  • या आठवड्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या भाषणांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या व्यापार युद्धात चीनने वॉशिंग्टनवर शुल्काचा गैरवापर केल्याचा आरोप केला. त्यामुळे हे ट्रेड वॉर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबत सोन्याचे भावही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.