कल्पना करा, जर तुम्ही सकाळी लवकर डोळे चोळून तुमच्या घराबाहेरच्या अंगणात आलात किंवा टेरेसवर गेलात आणि तुमच्या समोर एक बिबट्या बसलेला असेल, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुमच्या मनात भीती दाटून येईल, तुम्ही घाबराल किंवा कदाचित पळून जाल… पण राजस्थानच्या पाली जिल्ह्यात लोक घाबरत नाहीत किंवा त्यांना आश्चर्यही वाटत नाही. उलट ते बिबट्याला ‘जुना शेजारी’ मानतात आणि बिबट्या कधी समोर आला तर त्याच्याकडे पाहून हसतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे. राजस्थानमधील हे असे ठिकाण आहे जिथे माणूस आणि बिबटे यांच्यात परस्पर समजूतदारपणा आणि विश्वासाचे एक अनोखे नाते आहे. येथील लोक बिबट्यांना शत्रू मानत नाहीत तर गावाचे रक्षक मानतात. या नात्यात भीतीऐवजी विश्वास आहे आणि धोक्याऐवजी एकमेकांसोबतचे सहअस्तित्व आहे. जाणून घेऊयात या आगळ्यावेगळ्या गावाविषयी.
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील काही गावे, जसे की बेरा, फालना, दंतीवाडा आणि जवाई, त्यांच्या खास कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. या भागात बिबटे मोकळ्या मैदानात फिरतात, डोंगरावरील गुहांमध्ये राहतात आणि कधीकधी घरांच्या छतावरही दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथील लोक बिबट्यांना घाबरत नाहीत किंवा त्यांच्यावर हल्लाही करत नाहीत. उलट, बिबटे इथल्या लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहेत.
या गावांमध्ये राहणारा रबारी समुदाय बिबट्यांना धोका म्हणून नव्हे तर त्यांचे मित्र म्हणून पाहतात. त्यांच्या दृष्टीने बिबटे हे गावाचे रक्षण करणारे प्राणी आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की बिबटे वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण करतात. या श्रद्धेचा प्रभाव त्यांच्या मनावर इतका खोल आहे की जर बिबट्याने एखाद्याची बकरी पळवली तरी लोक ती ‘नैसर्गिक देणगी’ मानतात आणि त्याच्यावर रागावत नाहीत.
पाली जिल्ह्यातील जवाई परिसर हा विशेषतः बिबट्यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील पर्वतीय गुहा आणि शांत वातावरण या वन्य प्राण्यांसाठी एक आदर्श निवासस्थान आहे. एकट्या जवाई परिसरात 60हून अधिक बिबटे राहतात असे मानले जाते. त्यांच्यामुळे लांडगे आणि तरस यांसारख्या भक्षकांना आळा बसतो, कारण हे प्राणी गावातील पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असतात.
लाल पगडीवरून ओळखला जाणारा रबारी समुदाय भटक्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. मात्र ते पिढ्यानपिढ्या आता याच भागात स्थायिक झाले आहेत. बिबट्यांसोबतचे त्यांचे नाते भीती आणि संघर्षाचे न राहता समजूतदारपणा आणि आदराचे झाले आहे.
जवाई आणि बेरा यांसारखी गावे आता जंगल सफारी करणाऱ्या उत्साही लोकांसाठी एक आकर्षक केंद्र बनली आहेत. अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या भागात तुम्हाला बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसतात. येथील सफारी देखील खास आहे कारण येथे प्राण्यांना जंगलात पाहण्याऐवजी प्रत्यक्ष माणसांसोबत भटकताना पाहता येऊ शकते.
सध्या मानव आणि वन्यजीवांमधील संघर्षाच्या बातम्या वारंवार कानावर येऊ लागल्या आहेत. बिबट्या तसेच अन्य जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याचे आपल्याला ऐकायला मिळते. अशावेळी पाली जिल्ह्याचे हे मॉडेल एक धडा देते. यावरून असे दिसून येते की सर्वच मानवजात वन्य प्राण्यांशी सुसंवाद राखून शांततेत राहू शकते. रबारी समाजाचे बिबट्यांशी असलेले हे अनोखे नाते ही केवळ एक काल्पनिक कथा नाही तर पर्यावरणासोबत संतुलित जीवन जगण्यासाठी घालून दिलेला एक वस्तुपाठच आहे.
हेही वाचा : Exercise : या वर्क आउटने सुटलेले पोट होईल गायब
संपादित – तनवी गुडे