भारतीय क्रिकेटपटू अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा हा देखील त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग बनला होता. आता त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मिडियामध्ये असे रिपोर्ट्स आले होते की त्याची पत्नी गरिमा यांनी पोलिसांकडे घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यांनी तक्रार करताना म्हटले होते की पती आणि सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ होत आहे.
हुंड्यात होंडा सिटी कार आणि १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच पती अमित मिश्राचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचाही दावा त्यांनी केला होता. हे सर्व आरोप आता अमित मिश्राने फेटाळले आहेत. हे रिपोर्ट्स खोटे असल्याचे आणि त्याच्याशी संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे.
४२ वर्षीय अमित मिश्राने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की जर त्याचे नाव आणि फोटो कोणत्याही असंबंधित गोष्टींशी जोडले, तर त्यावर तो कायदेशीर कारवाई करेल.
अमित मिश्राने पोस्टमध्ये लिहिले, 'मीडियामध्ये जे काही फिरत आहे, त्यामुळे मी खूप निराश आहे. मी नेहमीच पत्रकारांचा आदर करतो, परंतु कदाचित बातमी अचूक असेल, पण माझा फोटो वापरणे अत्यंत चुकीचे आहे. असंबंधित गोष्टीं माझा फोटो वापरणे त्वरित बंद करा. अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.'
अमित मिश्राने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ७६ विकेट्स घेतल्या. ३६ वनडे सामने खेळताना त्याने ६४ विकेट्स घेतल्या, तर १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १६ विकेच्स घेतल्या आहेत.
त्याने आयपीएलमध्ये १६२ सामने खेळले असून १७४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये तीन हॅट्रिकही घेतल्या. तो तीन हॅट्रिक घेणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.