Sangamner: जनसुरक्षा विधेयकाविरोधात 'माकप'चे शक्तिप्रदर्शन; सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
esakal April 23, 2025 08:45 PM

संगमनेर : व्यक्ती व संघटनांना बेकायदा ठरविण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारच्या हातात देणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मंगळवारी (ता. २२) डावे पक्ष व समविचारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संगमनेरातील प्रांत कार्यालयावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला.

राज्य सरकार, शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी हा कायदा येत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात या विधेयकामुळे सरकारच्या हातात कारवाईचे बेसुमार अधिकार एकवटणार आहेत.

सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनांना राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्याच्यावर कारवाई करू शकणार आहे. दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा व अशी व्यक्ती, व्यक्तीचे नातेवाईक व अशा संघटनांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार या विधेयकाच्या अन्वये राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत. संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ अकोले व संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक यावेळी एकत्र आले.

स्वातंत्र्य चौकातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. घोषणा देत मोर्चा शहरामध्ये फिरवत प्रांत कार्यालयावर घेण्यात आला. झालेल्या जाहीर सभेमध्ये वक्त्यांनी राज्य सरकारच्या लोकशाही विरोधी कृतींवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी बिलकुल खपवून घेणार नाही, असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला.

कॉ. सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे, नंदू गवांदे, नशीब वरपे, वसंत वाघ, हेमलता शेळके, गणेश ताजणे, संगीत साळवे, रंजना पराड, अनिता साबळे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, द्रौपदा रावते, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, मथुराबाई बर्डे, आशा घोलप, अविनाश धुमाळ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, काळू मेंगाळ आदींनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.