टू व्हीलर बाईक टॅक्सीला प्राणपणाने विरोध करू
esakal April 23, 2025 08:45 PM

पिंपरी, ता. २३ ः राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह एक लाख अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये टू व्हीलर टॅक्सी सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे आर्थिक अडचणीत असलेले रिक्षा व टॅक्सी चालक व्यवसायावर परिणाम पडणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. रिक्षाचालक मालकांचे इतरही प्रश्न सोडवावेत, अशी मागणी रिक्षा चालक मालकांच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ‘ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, ऑटो टॅक्सी ट्रान्स्पोर्ट फेडरेशनच्या (दिल्ली) वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरटीओच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी टू. व्हीलर बाईक टॅक्सीवर चर्चा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष गुंड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, विशाल ससाणे आदी उपस्थित होते.
सरकारच्या मुक्त रिक्षा परवानामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ४५ हजार रिक्षा रस्त्यावर धावतात. पुणे शहरात एक लाख वीस हजार रिक्षा झाले आहेत. प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशी परिस्थिती झाली आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांना गरजा भागवणे मुष्कील झाले आहे. टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षा टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे संपून जाईल. सरकारने टू व्हीलर टॅक्सीची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
------

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.