मुरूडला नव्या लालपरीची प्रतीक्षा!
अन्य आगाराला प्रत्येकी पाच गाड्यांचा पुरवठा; प्रवाशांमध्ये नाराजी
मुरूड, ता. २३ (बातमीदार) ः मुरूड एसटी महामंडळ आगाराचे भारमान चांगले असूनही प्रवासी वाहतूक अनेक वर्षांपासून जुन्या गाड्यांवरच रेटली जात आहे. रायगड विभागातील मुरूड आगार वगळता अन्य ठिकाणी प्रत्येकी नव्या पाच लालपरी दिल्या असून, मुरूडकरांना सापत्न वागणूक का दिली जात आहे, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे मुरूड आगारालादेखील नव्या एसटी गाड्या देण्यात याव्यात, अशी मागणी मुरूडकरांकडून करण्यात येत आहे.
मुरूड आगारातून दररोज मुंबई, कल्याण, ठाणे, बोरिवली, स्वारगेट, धुळे, शिर्डी आदी स्थानी प्रवासी सेवा कार्यान्वित आहेत. कॅब, टॅक्सी वा अन्य पिकअपसारखी समांतर प्रवासी सेवा उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्याच्या एसटीवरच येथील नागरिक निर्भर आहेत. वस्तुतः मुरूडसारख्या नावारूपाला आलेल्या पर्यटन केंद्राच्या ठिकाणी शिवशाही, वातानुकूलित बसेस महामंडळाने पुरवल्या तर पर्यटन निश्चितपणे वाढेल. मात्र नवीन बसेस उपलब्ध करून देण्याविषयी उदासीनता दिसून येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुरूड आगारात सद्य:स्थितीत एकूण ३५ एमएस बॉडीच्या प्रवासी बसेस असून, आगारातून १३० फेऱ्या केल्या जातात. तर दररोज १२ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक केली जाते. रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबागसह पेण, रोहा, कर्जत, महाड, माणगाव व श्रीवर्धन तसेच मुरूड अशा आठ एसटी आगारांचा समावेश आहे. यामध्ये मुरूड आगार वगळता प्रत्येक ठिकाणी पाच ते दहा नवीन बसेस प्राधान्याने पुरविण्याची तत्परता दाखवली गेली आहे. मात्र मुरूडसारख्या एका बाजूला असलेल्या पर्यटनस्थळालाच का डावलले गेले, असा सवाल प्रवासीवर्गाकडून केला जात आहे. नवीन एसटीची प्रवासी आसन क्षमता ४१ असून, बीएस सहा या आधुनिक पद्धतीच्या बसेसमध्ये वैद्यकीय सुरक्षा, मोबाईल चार्जिंगसह सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांना आरामदायी वाटतील, अशी सुविधा देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र या नव्या लालपरीत कधी बसून प्रवास करता येईल, याकडे विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे. मध्यंतरी मुरूड आगारातून १५ एप्रिल २०२५ पासून संभाजीनगर व जालना या बसेस सोडण्यात येतील, असे जाहीर केले गेले. दरम्यान, बसेस न आल्याने ही केवळ घोषणाच ठरली.
....................
साळाव पुलामुळे अडचण
मुरूड आगाराला नवीन बसेस कधी मिळणार, याविषयी विभाग नियंत्रक दीपक घोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मुरूडला शिवशाही तसेच आरामदायी बसेस मंजूर झाल्या होत्या, परंतु साळाव पुलावरून १६ टन वजनाच्या बसेसना प्रवासी वाहतुकीस सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मनाई केल्यामुळे त्या परत पाठवाव्या लागल्या. हीच पूर्व अट नवीन एसबी सहा लालपरींना घातल्यामुळे त्या देता येत नाहीत. अर्थात १५ दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंता यांना पेण कार्यालयातून पत्रव्यवहार केला असून, अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने कुठलाही खुलासा न केल्याचे घोडे यांनी सांगितले.