आयपीएल इतिहासातील सर्वात पहिली यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची ओळख आहे. मुंबई इंडियन्सने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मात्र मुंबईला आयपीएल 2025 मध्ये आपल्या प्रतिष्ठेला साजेशी सुरुवात करता आली नाही. मुंबईला पहिल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र पलटणने त्यानंतर दणक्यात कमबॅक केलं. मुंबईने आता सलग चौथा विजय मिळवला आहे. मुंबईने बुधवारी 23 एप्रिलला राजीव गांधी स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. ट्रेंट बोल्ट हा मुंबईच्या विजयाचा प्रमुख नायक ठरला. बोल्टने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
बोल्ट व्यतिरिक्त दीपक चाहर यानेही चिवट बॉलिंग केली. दीपकने 4 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने 12 धावा देत दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 रन्सच करता आल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत नेलं. रोहितने 46 चेंडूत 70 धावा केल्या. तर सूर्याने 19 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
“हा सामना जिंकणं फार चांगलं आहे. आमचे खेळाडू ट्रॅकवर येत आहेत,याचा आनंद आहे. एकदा का टीममध्ये सर्वांनी चांगली कामगिरी करायला सुरुवात केली तर दबदबा तयार होईल, असं मला वाटतं. दीपक चाहर आणि टेंट्र बोल्ट या दोघांनी पाया रचला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. एकूणच हा शानदार विजय होता”, असं हार्दिकने म्हटलं आणि मुंबईच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं.
नेतृत्व कधी कधी सामान्य ज्ञानावर निर्भर असते, याची मला जाणीव झाली. मला खेळ पाहणं आणि प्रतिक्रिया देणं आवडतं. तसेच आधी ठरवल्याप्रमाणे योजनेवर अवलंबून राहता कामा नये”, असं हार्दिकने नमूद केलं.
हार्दिकने विघ्नेश पुथुर याच्या बॉलिंगबाबतही प्रतिक्रिया दिली. “विघ्नेश एक विकेट घ्यावी, असं वाटत होतं. विघ्नेश या युवा खेळाडूने काही सामने खेळले नाहीत, त्यासाठी हे अवघड होतं हे मी समजू शकतो. तसेच मी या विजयाने समाधानी आहे”, असं हार्दिकने जाता जाता सांगितलं.