संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला निर्धार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान ज्यांनी रचले, त्यांना लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा निर्धार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात भारताच्या विविध भागांमधून पर्यटनासाठी तेथे गेलेल्या 26 हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आली होती.
राजनाथ सिंग यांनी या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. ज्यांनी पडद्याआड राहून हा दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यांना आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही. दहशतवाद्यांनी एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा भ्याडपणा दाखविला आहे. त्यांना त्यांच्या कृतीची जबर किंमत भोगावी लागणार आहे. दहशतवादासंदर्भात भारताची भूमिका ‘शून्य सहनशक्ती’ची आहे. तिच्यावर या हल्ल्याचा काहीही परिणाम होणार नाही. दहशतवाद्यांना लवकरच धडा शिकवू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सर्व भारतीय एकत्र
या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व भारतीय एकत्र आले आहेत. आम्ही एकजुटीने या आव्हानाला परतविणार आहोत. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक आणि योग्य आहे, ते करणार आहोत. भारत हे एक मोठे राष्ट्र आहे. त्याची संस्कृती पुरातन आहे. आम्ही अशा हल्ल्यांनी डगमगून जाणार नाही. हल्लेखोरांना जरब बसेल असा धडा आम्ही शिकवू. लवकरच याचे प्रत्यंतर येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सेनेला सूचना
राजनाथ सिंग यांनी या हल्ल्यानंतर भारतीय सेनेच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. संवेदनशील भागात सेनेच्या तुकड्यांमध्ये वाढ करावी. संपूर्ण सीमाक्षेत्रात अधिक दक्षता घेण्यात यावी आणि दहशतवादविरोधी कारवाईत मोठी वाढ करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. ही बैठक जवळपास दोन तास चालली होती. बैठकीत सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. भूसेना प्रमुख जनरल द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि वायुदल प्रमुख ए. के. सिंग तसेच तिन्ही सेनादलांचे संयुक्त प्रमुख जनरल अनिल चौधरी हेही बैठकीला उपस्थित होते.
नागरी अधिकारीही उपस्थित
या बैठकीला संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग, सेना कार्यवाहीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि इतर काही विभागांचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे, यावर या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.