बोगस शिक्षकभरतीप्रकरणी ठोस कारवाई करा; शिक्षक भारती सोलापूर संघटनेची मागणी
Marathi April 24, 2025 12:33 PM

राज्यातील नागपूर येथील शिक्षकभरती आणि शालार्थ आयडी घोटाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असतानाच, सोलापूर जिल्ह्यातदेखील याच धर्तीवर मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस येत आहेत. शिक्षक भारती, सोलापूर या संघटनेने निवेदनाद्वारे हे प्रकरण उपस्थित करूनही, माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे येथील उपसंचालक कार्यालयाने आजतागायत कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप संघटनेने केलेला आहे.

‘शिक्षक भारती’च्या माहितीनुसार, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बनावट व बोगस मान्यतांवर शिक्षकांची भरती करून त्यांना शालार्थ आयडी मिळवून देण्यात आले आहेत. यासाठी पूर्वीच्या काही शिक्षणाधिकाऱ्यांनी शासननिर्णय डावलून बोगस मान्यता दिल्याचे पुरावे संघटनेने वेळोवेळी सादर केले आहेत. सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या तसेच बदली होऊन गेलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळानंतर अनेक बोगस मान्यता मोठ्या रकमा घेऊन दिलेल्या आहेत. अशा मान्यतांची नोंद व नस्ती माध्यमिक शिक्षण विभागात नसतानादेखील त्यांच्या शालार्थच्या प्रस्तावावर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शिफारस करून पुणे उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले आहेत. यामुळे बोगस मान्यता व शालार्थबाबतीत सोलापूरमध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला आहे.

काही लाभाथ्यर्थ्यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवताना चुकीची माहिती दिली असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आधीपासूनच शासकीय सेवेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये नोकरी मिळवताना काहीजण शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील ब्लॅकलिस्ट उमेदवार असताना मान्यता मिळवलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर, नागपूर येथील गाजत असलेल्या शिक्षकभरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची पुनरावृत्ती सोलापूरमध्येही झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक भारतीने निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. नागपूरप्रमाणे सखोल चौकशी होऊन बोगस मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातात बेड्या पडणार का, याकडे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण व्यवस्थेतील प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होऊ नये आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी शिक्षक भारतीचा संघर्ष सुरूच राहील. बोगस मान्यतांचे समर्थन कोणीही करू शकत नाही. या मान्यता देताना मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. यासाठी संघटनेच्या निवेदनानुसार चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी केली आहे.याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे विजयकुमार गुंड, तीपन्ना कोळी, प्रा. शाहू । बाबर, भगवंत देवकर, रमेश जाधव, शरद पवार, प्रकाश अतनुर, मायप्पा हाके, रियाजभाई | अत्तार, समीर शेख आदी उपस्थित होते.

‘शिक्षक भारती’च्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बोगस मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. परंतु शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या कार्यालयाने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. बोगस मान्यता देणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नेमकं वाचवतंय कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच, ‘शिक्षक भारती’च्या | निवेदनांना दुर्लक्ष करून, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू न देण्याचा प्रयत्न माध्यमिक शिक्षण विभागात सुरू आहे.
– सुजितकुमार काटमोरे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.