पुणे - काश्मीरचे निखळ सौंदर्य डोळ्यात अन् मनात साठविण्यासाठी पुण्यातील तीन 'तरुणतुर्क' वृद्ध काश्मीरला पोचले. गुलमर्ग, सोनमर्ग फिरून पहलगामला पोचले. त्याचवेळी रस्त्यात झाड कोसळल्याने ड्रायव्हरने तिघांनाही घेऊन हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
ही घटना समजताच तिघेही काळजी करू लागले, त्यांच्या कुटुंबीयांचा जीव कासावीस झाला. पण ते थांबलेल्या हॉटेलमधील मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांनी "आपके पहले हम मरेंगे, आप को कुछ नही होणे देंगे' हा विश्वास दिला, पहलगाममधील वाढत्या मुक्कामावेळी त्यांना अक्षरशः 'काश्मीरीयत'चे दर्शन घडविले!
सनसिटी रोड परिसरात राहणारे ८२ वर्षांचे माधव कुलकर्णी, एमआयटी कॉलेज परिसरात वास्तव्य करणारे ८४ वर्षांचे उद्धव फडणीस व खडकीतील ८२ वर्षीय मारुती इंगोले हे तिघेही घनिष्ठ मित्र. हे तीन 'तरुणतुर्क' 55 वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. अनेक वर्ष तिघेजण एकत्र येऊन आपल्याला आवडेल त्या ठिकाणी मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटतात.
यावेळी तिघांनी थेट जम्मू व काश्मीरचे निखळ सौंदर्य आपल्या डोळ्यात व मनात साठविण्यासाठी निघाले. काश्मीरला पोचल्यानंतर त्यांचे हॉटेलमध्ये चांगले आदरातिथ्य केले. तिघांनीही खासगी वाहन करून गुलमर्ग, सोनमार्गमध्ये फिरून घेतले. मंगळवारी ते इतर पर्यटकांप्रमाणेच पहलगाममध्ये पोचले. आता घनदाट झाडीने व्यापलेली पहलगामची 'व्हॅली' पाहण्यास तिघांना घेऊन त्यांचा ड्रायव्हर निघाला.
पहलगाममध्ये पोचून पुढे घोड्यावरून तिघेजण फेरफटका मारणार होते. पण तेवढ्यात तिथे मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याची माहिती ड्रायव्हरला मिळाली. त्याने धोका न पत्करता हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला, ते माघारी फिरले अर्धा तास रस्ता कापत असतानाच तिघांच्याही कुटुंबांचे फोन येऊ लागले, त्यानंतर त्यांना दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती कळली.
या मोक्याच्या क्षणात किंचितही वेळ न दवडता ड्रायव्हरने थेट हॉटेल गाठले. तिघांच्या मनात त्या घटनेमुळे भीती निर्माण झाली होती. तेव्हा, काळजीने रापलेले कुलकर्णी, उद्धव फडणीस व मारुती इंगोले यांना मुस्लिम ड्रायव्हर, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी "आपके पहले हमे मरेंगे, लेकिन आपको कुछ होणे देंगे !' हा शब्द दिला.
त्यानुसार 2 दिवस ते तिघेजण हॉटेलबाहेर पडले नाहीत, ड्रायव्हर, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांनी त्यांची काळजी घेतली, आदरातिथ्य केले. 'आम्ही आता कुठे कोरोनातुन बाहेर पडून स्थिरस्थावर झालो, तेवढ्यात हा हल्ला घडला. आता आम्ही पुन्हा उभारी कसे घेणार? हा प्रश्न कुलकर्णी यांना स्थानिक नागरिकांकडून विचारण्यात आला.
काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी पहलगाममध्ये पोचलेल्या सरहद संस्थेचे कार्यकर्ते वैभव वाघ यांनी त्यांना सहकार्य केले, त्यांच्या विमान प्रवासाची व्यवस्था केली. आता शुक्रवारी ते तिघेजण पुण्यात पोचणार आहेत.
...दिलदार आदिल !
कात्रज जवळील गुजरवाडी येथे राहणारे रामदास खोपडे हे त्यांच्या ११ वर्षीय मुलाला घेऊन काश्मीर पाहण्यासाठी आले होते. श्रीनगर, गुलमर्ग पाहिल्यानंतर ते पहलगाममध्ये पोचले, त्याचवेळी दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी सरहद संस्थेचे पहलगामधील कार्यकर्ते आदिल यांची भेट झाली.
आदिल यांनी पुणे, सोलापूर, नागपूरमधील १०० हून अधिक लोकांना परतीच्या प्रवासासाठी मोठी मदत केली. तर खोपडे व त्यांच्या मुलाला आदिल यांनी घरी नेले. आदिलच्या कुटुंबाने दोघांचाही चांगला पाहुणचार केला. इतकेच नव्हे, तर आदिलने स्वतःच्या खर्चाने दोघांसाठी विमानाची तिकिटे काढून देत 'माणुसकी'चे दर्शन घडविले.