मंचर - 'पहलगाम- जम्मू-काश्मीर परिसरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या जीप्रसारमाध्यमांद्वारे समजताच आमच्या गावी असलेल्याकुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 'सतत फोन येत होते 'कधी येणार तुम्ही?', 'सुरक्षित आहात ना?' - प्रत्येक कॉलमागे एक काळजीची वेदना होती. असे सांगताना अजूनही मन हेलावून जाते. डोळे भरून येतात” असे मंचर (ता.आंबेगाव) येथील शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसनराव शिंदे यांनी सांगितले.
'पहलगाम येथे मंगळवारी (ता. २२) अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. रविवारी (ता. 20) सोमवारी (ता. २१) त्या परिसरात आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील एकूण ३१ जण होते. त्यामध्ये १८ महिला व तीन लहान मुले होती.
शिक्षक अंजाभाऊ तांबडे, शिरूर येथील शंकर गायकवाड, जुन्नर येथील शिक्षक एस. बी. नेटके, आर. डी. दुराफे, खोडद येथील युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी विलास गायकवाड, श्रीकांत मुथा, राधा तांबडे, शकुंतला तांबडे, संगीता शिंदे, प्रियांका घोंगडे यांचा समावेश होता. मंगळवारी सकाळी पुढील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अतिरेक्यांच्या हल्ल्याची माहिती कुटुंबियांकडून समजली. ही घटना ऐकून आमच्या सर्वांच्या अंगाचा धरकाप झाला.' असे भरत तांबडे यांनी सांगितले.
पुण्याहून सिया टुर्स अँड ट्रॅव्हल्समार्फत काश्मीरला रविवारी (ता. १३) झेलम एस्कप्रेसने प्रवासाला सुरुवात केली. पहलगाम येथून निघाल्यानंतर श्रीनगर ते कटार यामार्गे बसमधून प्रवास सुरु होता. थोड्या वेळातच रस्त्यावर लष्करी जवान आले. त्यांनी बस थांबवली. मार्गात त्यांनी बदल करून मुघलमार्गे कटारला जाण्याचा आदेश त्यांनी दिला. त्याप्रमाणे प्रवास सुरु केला.
या मार्गावर दुतर्फा सशस्त्र जवान उभे होते. हल्ल्यानंतर असुरक्षिततेचं वातावरण पसरलं. पण घाबरून जाऊ नका. असा धीर ठिकठिकाणी जवानांकडून दिला जात होता. दरम्यान गुरुवारी (ता. २४) हे पर्यटक आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत.