
मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं आहे’, असं विधान केलं आहे. त्यांच्या या असंवेदनशील विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
“दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात श्रेयवादाची लढाई सुरू आहे हे दुर्दैवी आहे. सध्याची वेळ ही सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे. पण खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्रातली जनता ही उपकाराची भाषा खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका. ज्या विमानातून तुम्ही लोकांना आणलेत, ती विमानसेवा लोकांच्या टॅक्समधून दिली जात आहे. त्याचे पैसे तुम्ही तुमच्या खिशातून भरलेले नाही. त्यामुळे उपकाराची भाषा करू नका,” असे रोहिणी खडसे म्हणाल्या.