रसरशीत आहार
esakal April 25, 2025 11:45 AM

- डॉ. मालविका तांबे

ग्रीष्म ऋतूमध्ये वातावरणात सगळीकडे उष्णता वाढलेली असते. सकाळी साडेसात-आठपासून संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडणे ही एक अवघड परिस्थिती असते. उष्णता वाढल्यामुळे शरीरात पित्तदोषही वाढतो, व त्यामुळे शरीरात एकूणच कोरडेपणा तयार होतो. सतत काहीतरी प्यावे अशी इच्छा होते. जेवायची इच्छा होत नाही.

सतत घाम आल्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ व्यवस्थित राहण्यावर सगळ्यांनी भर देणे आवश्यक असते. लघवी साफ व्हावी, घामाचा वास येऊ नये, अशक्तपणा वाटू नये, उत्साह वाढावा या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पेयपदार्थ या दिवसांत घेणे उत्तम असते. त्यातील काही हेल्दी प्रकार आपण आज पाहू या.

1) थंड पाणी – गरमीच्या दिवसांत सर्वप्रथम थंड पाणी पिण्याची सुरुवात होते. थंड पाणी अर्थात शीतल पाणी. पाण्याच्या शीतलतेचा गुण वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याकडे पूर्वीपासूनच वाळा, चंदन वगैरे द्रव्ये घालून पाणी पिण्याची पद्धत आहे. शक्य झाल्यास पिण्याचे पाणी उकळून त्यात ‘जलसंतुलन’ घालावे, जेणेकरून पाण्याचा शीतलतेचा गुण वाढतो पण पाणी फ्रीजमध्ये गार करावे लागत नाही.

यामुळे तहान लवकर भागते तसेच पचनालाही मदत होते. याऐवजी पाण्यात बर्फ घातलेले किंवा फ्रीजमधील थंड पाणी पाण्याची सवय ठेवली तर अपचन होणे, पोट साफ न होणे, वजन वाढणे वगैरे त्रास होताना दिसतात. ज्यांना सामान्य तापमानाचे पाणी प्यायला आवडत नाही त्यांनी माठात गार केलेले पाणी प्यावे.

हे शक्य नसल्यास फ्रीजमधील थंड पाण्यात थोडे सामान्य तापमानाचे पाणी मिसळून प्यावे. फ्रीजमधील पाणी प्यायल्यास बऱ्याचदा ॲलर्जिक सर्दी होणे, घसा दुखणे वगैरे त्रास वरचेवर होताना दिसतात.

बाहेर उन्हात जाताना गॉगल घालणे, टोपी घालणे, छत्री घेणे, स्वतःला दुपट्ट्यासारख्या पातळ वस्त्राने गुंडाळणे उत्तम असते. बाहेरच्या गरम तापमानातून घरात आल्यावर एसी वा पंखा सुरू असतो. याचबरोबरीने लगेच गार पाणी पिण्यास आले तर शरीराला तापमान बदलाशी जुळवून घेणे कठीण जाते.

त्यामुळे बाहेरून घरात आल्या आल्या गार पाणी पिणे टाळावे, एसी वा पंख्याच्या झोतात बसू नये. पूर्वीच्या प्रथेनुसार एक छोटा गुळाचा खडा घाऊन नंतर सामान्य तापमानाचे पाणी प्यावे. याच पाण्यात लिंबाचा रस सैंधव मीठ, खडीसाखर एखादे पुदिन्याचे पान घालून लिंबाचे सरबत घेता येते. उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो फार दाट सरबत पिण्यापेक्षा पातळ व माइल्ड सरबत पिणे योग्य असते.

2) कोकम सरबत – कोकम फळाचा वापर उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत उत्तम ठरतो. थोड्या पाण्यात कोकम भिजवून ठेवावे. व्यवस्थित भिजल्यावर हाताने कुस्करावे वा ग्राइंडर फिरवावा, चवीपुरते मीठ, जिरे पूड, साखर व गरजेनुसार पाणी घालून केलेले कोकम सरबत पिणे उत्तम. बाजारात उपलब्ध असलेल्या कोकम सिरपमध्ये रासायनिक रंग व प्रिझर्वेटिव्हज् टाकलेले असण्याची शक्यता असते.

शक्य झाल्यास घरी बनविलेले कोकम सरबत पिणे उत्तम. अधून मधूम कोकम आगळ, नारळाचे दूध वगैरेंपासून केलेली सोलकढी प्यायलाही हरकत नाही. सोलकढी प्यायल्याने शरीरात थंडावा तर येतोच, बरोबरीने पचन सुधरायलाही मदत मिळते. सोलकढीत घातलेले नारळाचे दूधही शरीराला शीतलता आणण्यास मदत करते व यातील आले पचन सुधरायला मदत करते.

3) नारळाचे पाणी – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी शहाळी आणून ठेवावी. गरज पडेल तसे शहाळ्याचे पाणी घेण्याने लघवी साफ व्हायला, शरीरातील उष्णता कमी व्हायला तसेच पित्तशमन व्हायला, उन्हाळ्यामुळे आलेली मरगळ कमी व्हायला मदत मिळते. नारळाचे पाणी नैसर्गिक असल्यामुळे यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही. कार्ल्याला येणारी बरीच पाश्र्चात्य मंडळी भारतात कुठेही फिरायला जातात तेव्हा आम्ही त्यांना बाहेर गेल्यावर शहाळ्याचे पाणी घेतले तर चालेल अशी सूचना देतो.

4) कैरीचे पन्हे – उन्हाळ्यात सगळ्यांत आवडती गोष्ट ती म्हणजे कैरी व आंब्याचे आगमन. आंब्याचा ताजा रस जेवताना खावा तसेच कैरीचे पन्हे घरी करून ठेवावे. कैरी पचनासाठी उत्तम असते, पित्तशमन करते. कैरी उकडून मिळालेल्या गरात साखर, गूळ, केशर, वेलची वगैरे घालून तयार केलेले कैरीचे पन्हे आपापल्या प्रकृतीनुसार घ्यायला हरकत नाही. कैरीचे पन्हे करायला अत्यंत सोपे असते. घट्ट पन्हे करून फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास आयत्या वेळी पाणी मिसळून, एखादा बर्फाचा तुकडा घालून घेता येणे शक्य असते.

5) उसाचा रस – उसाचा ताजा रस थोडा लिंबाचा रस व मीठ घालून पिण्यासारखा दुसरा स्वर्गीय आनंद नाही. उन्हाळ्याच्या काळात बऱ्याच व्यक्ती उसाचा प्यायला बाहेर जातात. फक्त रस काढत असताना स्वच्छतेची काळजी नक्की घ्यावी लागते. ग्लास वा मशिन स्वच्छ नसल्यास उसाचा रस घेतल्यावर उलट्या, जुलाब वगैरैंचा त्रास होताना दिसतो.

यासाठी आम्ही बरोबर नेलेल्या मिनरल वॉटरने मशिन धुवून आमच्यासाठी रस काढायला सांगतो. असे करणे खर्चिक व वेळ घेणारे असले तरी उसाचा रस पिण्याच्या स्वर्गीय आनंदापुढे हे कष्ट काहीच नाहीत असे म्हणता येते. उसाच्या रसात साखरेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे सध्याच्या काळात मात्र उसाचा रस प्यायला काही लोक भितात.

6) फळांचा रस – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारची रसाळ फळे उपलब्ध असतात. संत्री, मोसंबी, द्राक्षे, कलिंगड, खरबूज वगैरे फळांचे तुकडे करून खाणे किंवा त्यांचा रस काढून पिणे उत्तम असते. पचनाच्या व पित्तशमनाच्या दृष्टीने संत्र्याच्या वा द्राक्षाच्या रसात थोडे संतुलन बिल्वसॅन घालून पिणे इष्ट ठरते. यामुळे पचनही सुधारते व शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत मिळते.

7) दुधाचे सरबत – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सामान्य तापमानाचे किंवा तापमान थोडे कमी केलेले दूध पिणे चांगले असते. दुधात आपल्या आवडीनुसार संतुलन गुलकंद स्पेशलसारखा उत्तम प्रतीचा गुलकंद घालून त्याचे सरबत तयार केले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्तम पेय करता येते. संतुलन गुलकंद स्पेशलमध्ये असलेले प्रवाळ व वेलची हे दोन्ही घटक चव, सुवास व पित्तशमनासाठी उत्तम असतात.

दूध थोडे आटवून, गार करून, गुलकंद घालून गुलकंदाची कुल्फी वा आइस्क्रीम घरी करता येते. दुधात सुका मेवा घालून थंडाई करण्याची पद्धत आपल्यात रूढ आहे. सकाळी न्याहारीच्या वेळी असे दूध प्यायल्यास दिवसभर पोट शांत राहते.

8) ताक - दुग्धवर्गातील अजून एक सदस्य तो म्हणजे ताक. जसे देवांसाठी अमृत श्रेष्ठ आहे तसे पृथ्वीवरच्या मनुष्यासाठी ताक श्रेष्ठ आहे असे म्हटले जाते. अरुची, पोटातील जडपणा, मूळव्याध या सगळ्यांसाठी ताक उत्तम सांगितलेले आहे.

ताकात सैंधव, सुंठ, काळी मिरी, दालचिनी, जिरे वगैरे द्रव्ये आपल्या चवीनुसार घालावीत, किंवा तूप, जिरे, हिंग, कोथिंबीर, आवडत असल्यास हिरवी मिरची यांची वरून फोडणी देऊन केलेले ताक पिता येते. असे ताक जेवल्यानंतर किंवा भूक नसल्यास जेवणाऐवजी पिता येते.

9) आइस्क्रीम – आइस्क्रीम ही उन्हाळ्यातील सर्वांत लोकप्रिय गोष्ट असेल. पण आइस्क्रीम खात असताना २-३ गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आइस्क्रीम दुधापासूनच बनविलेले आहे ना हे पाहावे. सध्या दुधाऐवजी तेल वापरण्याचा प्रघात आलेला आहे. दुसरे म्हणजे दूध फार आटवून आइस्क्रीम केले तर ते पचायला जड पडते.

चर्निंग करून बनविलेले आइस्क्रीम हलके असते व हे बनविताना दूध फार घट्ट करण्याची गरज नसते. आइस्क्रीम दुधापासून बनविलेले असल्यामुळे स्ट्रॉबेरी, अननस, चिकू वगैरे घालून आइस्क्रीम तयार करू नये. केशर, व्हॅनिला आइस्क्रीम खाणे चांगले.

एकाच वेळी खूप आइस्क्रीम खाण्याऐवजी रोज थोडे थोडे आइस्क्रीम खाणे उत्तम. तसेच आइस्क्रीम खाऊन झाल्यावर निदान लहान मुलांना तरी एक घोट गरम पाणी द्यावे. यामुळे घशाला त्रास होत नाही.

अशा प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड गुणाच्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून वापर केला तर उन्हाळा सुसह्य व्हायला मदत मिळू शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.