Latest Marathi News Updates : पहलगाम हल्ल्यानंतर कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला
esakal April 25, 2025 03:45 PM
Delhi Live : पहलगाम हल्ल्यानंतर कपिल सिब्बल यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, "... पंतप्रधानांसाठी माझे काही सूचना आहेत. सर्वांकडून चर्चा करण्यासाठी आणि सूचना घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. देश त्याच्या पाठीशी उभा आहे... दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याला कोणताही धर्म नसतो... जगासमोर राष्ट्राच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर केला पाहिजे... आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ आफ्रिका, अमेरिका, युरोप, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि दक्षिण अमेरिका यासारख्या देशांमध्ये पाठवले पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना जागतिक स्तरावर परिस्थितीबद्दल सांगू शकू. जर आपण हे पाऊल उचलले नाही तर आपण राजनैतिक दबाव निर्माण करू शकणार नाही..."

Satara Live : पोलिस हवालदाराचे कारवरील नियंत्रण सुटले, अंगणात झोपलेल्या नागरिकाचा मृत्यू

भुईंज पोलिस स्टेशनला नाईट ड्युटी संपवून हवालदार ज्ञानेश्वर बाबुराव राजे हे त्यांच्या अल्टो कारमधून घरी परतत होते. पहाटे सव्वा तीन वाजता सर्कलवाडीत आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने पहाटे झालेल्या कार अपघातात घराबाहेर अंगणात झोपलेल्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला.

J&K Live : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडविली

सुरक्षा दलांनी आसिफ शेख आणि आदिल या दोन्ही दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहेत.

UK Live : लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने पहलगाम हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

लंडन, यूके येथील भारतीय उच्चायुक्तालयाने इंडिया हाऊस येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

Delhi Live : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर आणि उधमपूरला रवाना होणार

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर आणि उधमपूरला रवाना होतील. ते काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर्स आणि इतर सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. ते खोऱ्यातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लंघनाच्या प्रयत्नांचा आढावा घेतील

Rahul Gandhi : दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. ते जीएमसी अनंतबाग येथे जखमींना भेटणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काश्मीरला जात असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Pakistani Citizens : पुणे शहरात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; पोलिसांची माहिती

पुणे : शहरात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून, त्यापैकी ९१ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. तसेच आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे.

Pahalgam Terror Attack : 'हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची गरज नाही'; दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री आठवले स्पष्टच बोलले

मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "पहलगाममधील दहशतवादी हल्ला खूप गंभीर आहे. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा आटोपून भारतात परतले आहेत. हा अतिशय गंभीर हल्ला असून यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. मला वाटतं, की यावर हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची गरज नाही..."

Emmanuel Macron : 'या दुःखाच्या क्षणी फ्रान्स भारताच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे'; फ्रान्सच्या अध्यक्षांनी मोदींना दिला धीर

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विटवर पोस्ट करत लिहिलंय की, "मी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबद्दल बोललो आहे, ज्यामध्ये निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी बळी गेला. या दुःखाच्या क्षणी फ्रान्स भारत आणि त्याच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे."

Pahalgam Terror Attack : भारताच्या कारवाईनंतर सिमला कराराला बिथरलेल्या पाककडून 'ब्रेक'

इस्लामाबाद : दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देत सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत राजनैतिक निर्बंध लादले होते. भारताच्या या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेदेखील आता सिमला कराराला स्थगिती दिली आहे.

Kolhapur Bar Association Elections : बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आज (ता. २५) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी दिवसभरात ४५ हून अधिक अर्जांची विक्री झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. सुभाष पिसाळ काम पाहत आहेत. कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीतूनच ही प्रक्रिया सुरू आहे.

Ganpatipule News : कोल्हापूरच्या पर्यटकाचा गणपतीपुळेत बुडून मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात काल सायंकाळी ड्रॅगन बोटीवरून पडल्याने कोल्हापूरच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. सुरेश जेटानंद जेवरानी (वय ४९) असे त्यांचे नाव आहे.

Pahalgam Terror Attack : काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे PM मोदी 'ॲक्शन मोड'वर; दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा दिला इशारा

Latest Marathi Live Updates 25 April 2025 : काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देत सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत राजनैतिक निर्बंध लादले होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.