इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले. चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदाच हैदराबादने विजय मिळवला आहे. मात्र, चेन्नईला सलग चौथ्यांदा घरच्या मैदानात पराभवाचा धक्का बसला.
पहिल्या ९ सामन्यात चेन्नईला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नईचे प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. दरम्यान, चेन्नईचे नेमकं या सामन्यात काय चुकले, याबाबत कर्णधार एमएस धोनीने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वाबाद १५४ धावांपर्यंतच पोहचू शकला होता. चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक ४२ धावा केल्या, तर आयुष म्हात्रेने ३० धावा केल्या. हैदराबादकडून हर्षल पटेलने ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सनरायझर्स हैदराबादने १८.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. हैदराबादकडून इशान किशनने ४४ धावांची खेळी केली, तसेच कामिंडू मेंडिसने ३२ धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईकडून नूर अहमदने २ विकेट्स घेतल्या.
या पराभवानंतर म्हणाला, 'आम्ही विकेट्स गमावत राहिलो. पहिल्या डावात खेळपट्टी चांगली होती, त्यामुळे १५५ धावा ही धावसंख्या स्वीकार्य नाही. कारण खेळपट्टीवर फिरकीला फार मदत नव्हती. खेळपट्टीमध्ये फार काही विशेष नव्हते.'
'मला वाटतं आम्ही अजून धावा करायला हव्या होत्या. नक्कीच दुसऱ्या डावात खेळपट्टीकडून थोडी मदत मिळत होती, आमच्या फिरकी गोलंदाजीत दर्जा आहे, त्यांनी योग्य ठिकाणी गोलंदाजी केली. चेंडू थोडा थांबून येत होता, पण आम्ही १५-२० धावा कमी केल्या. '
ब्रेव्हिसचंही धोनीने कौतुक केले. तो म्हणाला, 'मला वाटते ब्रेव्हिसने खूप चांगली फलंदाजी केली. आम्हाला अशा फलंदाजीची मधल्या षटकात गरज आहे, जिथे आम्ही फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करत आहोत. ती अशी वेळ असते, जिथे फलंदाजांनी त्यांची क्षेत्र निवडावीत आणि तुमच्या क्षेत्रात मोठे फटके मारावेत. मला वाटतं आम्ही तिथेच कमी पडत आहोत. आम्ही मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंविरुद्ध जलद धावा करू शकत नाही.'
तो पुढे म्हणाला, 'या अशा स्पर्धांमध्ये जर तुमच्या एक किंवा दोन विभागात समस्या असतील, तर ते ठिक आहे, पण जर तुमचे बरेच खेळाडू चांगले खेळू शकत नसतील, तर गोष्टी आणखी कठीण होतात. तुम्हाला बदल करावे लागतात. पण जर अनेकजण चांगल्या फॉर्ममध्ये असतील, तर तुम्ही त्यांना अधिक सामने देऊ शकता. जर काही गोष्टी बरोबर नाही झाल्या, तरी तुम्ही पुढे जाता.'
'पण जर ४ जणं एकाचवेळी चांगली कामगिरी करत नसतील, तर तुम्हाला बदल करणे भाग पडते, कारण तुम्ही तसंच पुढे जाऊ शकत नाही. मी असं म्हणत नाही की प्रत्येकवेळी १८०-२०० धावाच व्हायला पाहिजे, पण परिस्थितीनुसार फलंदाजी व्हायला हवी.'
चेन्नईला अजून ५ साखळी सामने खेळायचे असून आव्हान जिंवंत ठेवण्यासाठी पाचही सामने जिंकण्यासोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.