Nitesh Rane : धर्म विचारुनच दुकानातून सामान विकत घ्या, मंत्री नितेश राणेंच हिंदुंना आवाहन
GH News April 26, 2025 12:07 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची चर्चा होत आहे. “हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. “दुकानदाराला हनूमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरात एका जनसभेला संबोधित करताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं. “त्यांनी मारण्याआधी आपला धर्म विचारला. म्हणून हिंदुंनी सुद्धा काही विकत घेण्याआधी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. ते तुम्हाला तुमचा धर्म विचारुन मारत असतील, तर तुम्ही सुद्धा सामान खरेदी करण्याआधी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. हिंदू संघटनांनी सुद्धा अशी मागणी केली पाहिजे” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

‘हनूमान चालीसा म्हणायला लावा’

“असही होईल की, काही दुकानदार त्यांचा धर्म सांगणार नाहीत, त्यांच्या श्रद्धेबद्दल खोटं सांगतिल” असं नितेश राणे म्हणाले. “जेव्हा तुम्ही खरेदीसाठी जाल, तेव्हा त्यांना त्यांचा धर्म विचारा. त्यांनी सांगितलं की, ते हिंदू आहेत, तर त्यांना हनूमान चालीसा म्हणायला लावा. त्यांना हनूमान चालीसा येत नसेल, तर त्यांच्याकडून काही विकत घेऊ नका” असं नितेश राणे म्हणाले.

‘कलमा म्हणायला लावला’

दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळी मारण्याआधी त्यांचं नाव आणि धर्म विचारला. प्रत्यक्षदर्शींनी हे सुद्धा सांगितलं की, हल्लेखोरांनी काही पर्यटकांना कलमा म्हणायला लावला. जे असं करु शकले नाहीत, त्यांची गोळी मारुन हत्या केली. या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची, बदला घेण्याची मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.