दुष्काळात तेरावा महिना… पाकिस्तानच्या लाहोर विमानतळाला भीषण आग; अनेक विमानांचं उड्डाण रद्द
GH News April 26, 2025 04:07 PM

भारताने पाणी रोखल्यास यांव करू, भारताने हल्ला केल्यास त्यांव करू, अशी भेकड धमकी देणारा पाकिस्तान चोहोबाजूने घेरला आहे. आज सकाळीच बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला असून त्यात पाकिस्तानचे 10 सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भारताने सिंधु जल करार स्थगित करण्याची घोषणा केल्याने हा करार रद्द होऊ नये म्हणून पाकिस्तानने मित्र देशांना मध्यस्थता करण्याची विनंती केली आहे. पण या देशांनी हातवर केल्याने पाकिस्तानची पुरती निराशा झाली आहे. या सर्व संकटांनी पाकिस्तान घेरलेला असतानाच आता पाकमधील लाहोर विमानतळाला मोठी आग लागल्याची बातमी आली आहे. ही आग अत्यंत भीषण आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानच्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग अत्यंत मोठी असल्याचं सांगितलं जातं. आग लागल्याने विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोर विमानतळावर पाकिस्तानी सैन्याचं एक विमान उतरत होतं. तेव्हा विमानाच्या टायरला मोठी आग लागली. आज सकाळी 10 वाजता ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीमुळे रनवे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.

पळापळ सुरू

या आगीच्या घटनेमुळे प्रवाशांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. आग लागल्यानंतर धुराचे लोट पसरले. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने एकच खळबळ उडाली. आधीच भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्याने पाकिस्तानी नागरिक भयभीत आहेत. ही आग पाहिल्यानंतर पाक नागरिक अधिकच घाबरले. काही विपरित तर घडलं नाही ना? अशी शंका त्यांच्या मनात आल्याने विमानतळावरच एकच पळापळ सुरू झाली. मात्र, ही आग विमानाच्या टायरला लागल्याचं कळल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

चौकशी सुरू

विमानांचं उड्डाण कधी सुरू होईल याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. सध्यातरी एकही विमान उड्डाण घेणार नसल्याचं लाहोर एअरपोर्टने जाहीर केलं आहे. तसेच जी विमानं उतरणार होती त्यांचेही मार्ग बदलले असून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशी विमानतळावरच ताटकळत बसले आहेत. विमानाच्या चाकाला आग कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची विमान प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

भारतीय विमानांना बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक पावलं उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्ताननेही भारताच्या विरोधातकाही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पाकिस्तानने भारताला त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. त्यामुळे भारतीय विमानांना वळसा घालून जावं लागणार आहे. पण पाकिस्तानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानलाच कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.