Pahalgam Attack : सर्वात मोठा झटका ! पाकिस्तान बनला न घर का ना घाट का, ज्यांच्याकडे झोळी पसरली, त्यांनीच केले हातवर
GH News April 26, 2025 03:06 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत दहशतीखाली येईल असं पाकिस्तानला वाटत होतं. पाकिस्तानचे मनसुबे उधळले गेले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच दहशतीखाली आला आहे. भारताकडून थेट युद्ध पुकारलं जाईल, असं पाकिस्तानला वाटत होतं. पण भारताने थेट युद्ध न करता पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. तसेच पाकिस्तानचं पाणीच रोखलं आहे. त्यामुळे पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबाला तरसणार आहे. भारताने सिंधु जल करारासह पाच मोठ्या अॅक्शन घेतल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान हादरून गेला आहे. परिणामी पाकिस्तानने मित्र देशांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. पण कोणीही पाकिस्तानला मदतीसाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडे पाकिस्तानने झोळी पसरली, त्यांनीच हात वर केल्याने पाकिस्तानसमोर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशाची केविलवाणी अवस्थाच मीडियासमोर मांडली आहे. पहलगाम हल्ला झाल्याने यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही मित्र देशांशी संपर्क साधला. तसेच या प्रकरणात मध्यस्थता करण्याची मदतही मित्र देशांना मागितली आहे. पण अद्याप कुणीही मध्यस्थता करण्याचा प्रयत्न केला नाही, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ पाकिस्तानच्या मित्र देशांनीही पाकिस्तानला एकटं सोडलं आहे. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्याचंही दिसून येत आहे.

मुस्लिम देशांकडून निषेध

दक्षिण काश्मीरमधील पहलगामला मिनी स्वित्झर्लंड संबोधलं जातं. त्यामुळे या ठिकाणी देशातूनच नव्हे तर विदेशातूनही पर्यटक फिरायला येतात. पण अतिरेक्यांनी या पर्यटकांवर मंगळवारी हल्ला केला. यात कमीत कमी 26 लोक मारले गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश आहे. तसेच अनेक लोक जखमीही झाले आहेत. अतिरेक्यांनी हा हल्ला करताना फक्त पुरुषांनाच गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली असून पाकिस्तान विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदवला जात आहे. मुस्लिम देशांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. कतार, जॉर्डन आणि इराकने या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दिल्लीतील अरब लीगच्या मिशनने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचा दावाही केला आहे.

सर्व पर्याय खुले आहेत

जगात एकटं पडल्यानंतर पाकिस्तान खडबडून जागा झाला आहे. पाकिस्तान आपली क्षेत्रीय अखंडता आणि संप्रुभतेच्या रक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल. कारण सिंधु जल करार कायम ठेवण्यासाठी अजूनही सर्व पर्याय खुले आहेत. हा 24 कोटी लोकांच्या आयुष्याचा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि द्विपक्षीय कराराने हा करार बनला आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते शफकत अली खान यांनी हे स्पष्ट केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.