आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची 18 व्या मोसमात वाईट स्थिती झाली आहे. चेन्नईची या हंगामातील कामगिरी पाहता त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. चेन्नई या मोसमात जास्तीत जास्त 14 पॉइंट्सपर्यंत मजल मारु शकते. मात्र प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 16 पॉइंट्स आवश्यक असतात. त्यामुळे चेन्नई या प्लेऑफमध्ये स्वत:च्या जोरावर पोहचणार नाही, हे निश्चित झालं आहे. त्यामुळे चेन्नईचं जर-तरचं आव्हान हे दुसर्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. मात्र चेन्नईच्या आशा फार कमी आहेत. कारण इतर संघाच्या खात्यात 10 आणि त्यापेक्षा अधिक पॉइंट्स आहेत. तर चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघाना फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांचे प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 3 संघांच्या खात्यात प्रत्येकी 12-12 गुण आहेत. अर्थात या 3 संघांनी प्रत्येकी 6-6 सामने जिंकले आहेत. या 3 संघांमध्ये गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा समावेश आहे. दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या तुलनेत गुजरात टायटन्सचा नेट रनरेट सरस आहे. त्यामुळे गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे.
तसेच चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स आहेत. मुंबई, पंजाब आणि लखनौच्या खात्यात प्रत्येकी 10-10 गुण आहेत. मात्र इतर 2 संघांच्या तुलनेत मुंबईचा नेट रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे मुंबई समान गुण असूनही चौथ्या क्रमांकावर आहे. अशाप्रकारे या 6 संघांना प्लेऑमध्ये स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे. पॉइंट्स टेबलमधील 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात.
कोलकाता नाईट रायडर्स टीमने 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरच्या खात्यात 6 गुण आहेत. तर केकेआर आणखी 6 सामने खेळणार आहेत. त्यामुळे केकेआर 18 पॉइंट्सपर्यंत पोहचू शकते, मात्र इथून प्रत्येक सामना जिंकणं अवघड आहे.
सनरायजर्स हैदराबाद आठव्या स्थानी आहे. हैदराबादने 9 पैकी 3 सामने जिंकला आहेत. तर हैदराबादला आणखी 5 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे हैदराबादही 16 गुणांपर्यंत पोहचू शकते. तसेच राजस्थान रॉयल्स नवव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 9 पैकी 7 सामने गमावले आहेत. हीच परिस्थिती चेन्नई सुपर किंग्सची आहे. त्यामुळे चेन्नई आणि राजस्थान दोन्ही संघानी उर्वरित सर्व सामने जिंकले तरीही त्यांचं प्लेऑफमध्ये पोहचणं अवघड आहे. तसेच हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 1 सामना खेळणार आहेत. त्यामुळे या पैकी कुणा एका संघाचं स्पर्धेतून बाहेर होणं निश्चित आहे.