आयपीएल 2025 मधील 44 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे ईडन गार्डन्स, कोलकातामध्ये करण्यात आलं होतं. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामन्यातील दुसर्या डावातील पहिल्या ओव्हरनंतर जोरदार वारा वाहू लागला. त्यानंतर पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर बराच वेळ पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी खेळण्याच्या दर्जाची करण्यासाठी ठराविक वेळ लागतो. मात्र वेळेची मर्यादा असल्याने हा सामना रद्द करण्याचं मॅच रेफरी आणि अंपायर्सकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. या 1 गुणामुळे मुंबईला मोठा झटका लागला आहे.
पंजाबने केकेआरसमोर विजयासाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी रहमानुल्लाह गुरुबाज आणि सुनील नारायण ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा केल्या. नारायण 4 रहमानुल्लाहने नाबाद 1 धाव केली. मात्र त्यानंतर जोरदार वारा सुटला. त्यामुळे काही मिनिटं खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर मेघराजाची एन्ट्री झाली. त्यामुळे सामाना थांबवण्यात आला. ईडन गार्डन्समधील उपस्थित क्रिकेट चाहते खेळ पुन्हा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र बराच वेळ प्रतिक्षा पाहिल्यानंतरही खेळ सुरु होण्याची चिन्हं नव्हती. त्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. आयपीएलने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.
दरम्यान या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या आणि श्रेयस अय्यर या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. प्रभसिमरन याने 83, प्रियांश आर्या याने 69 तर श्रेयस अय्यर याने नाबाद 25 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेस याने 7 आणि मार्को यान्सेनने 3 धावा केल्या. तर जोस इंग्लिस याने नाबाद 11 धावा केल्या. तर केकेआरकडून वैभव अरोरा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
सामना पावसामुळे कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल
कोलकाता विरुद्ध पंजाब सामना रद्द झाल्याने पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. या सामन्याआधी मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ प्रत्येकी 5-5 विजयांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी होते. पंजाबच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र सामना रद्द झाल्यानंतर कोलकाता आणि पंजाबला प्रत्येकी 1-1 गुण मिळाला. त्यानंतर पंजाबचे 11 पॉइंट्स झाले. पंजाबला या 1 गुणासह पॉइंट्स टेबल एका स्थानाचा फायदा झाला. पंजाब यासह चौथ्या स्थानी पोहचली. त्यामुळे मुंबईची पाचव्या स्थानी घसरण झाली.