वडगाव मावळ, ता. २६ : मावळ तालुक्यातील मोहितेवाडी (साते) येथे संकट मोचन हनुमान मूर्तीचा २८ वा वर्धापनदिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा झाला.
मोहितेवाडी येथील हरिनाम सप्ताहाचे हे २९ वे वर्ष होते. सप्ताहात तुषार महाराज दळवी, गणेश महाराज फरताळे, धर्मराज महाराज हांडे, गणेश महाराज कार्ले, आसाराम महाराज बढे यांची कीर्तने झाली. लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताह काळात आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविकांनी उपस्थित राहून कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. भव्य हनुमान मूर्तीची स्वागत कमान, उत्तम मंडप व्यवस्था, आकर्षक विद्युत रोशणाई, फटाक्यांची आतषबाजी, सुबक रांगोळी, उत्तम प्रतीच्या भोजनाची व्यवस्था ही यावर्षीच्या सप्ताहाची वैशिष्ट्य़े ठरली. महिलांनी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभाग घेऊन ग्रामप्रदक्षिणा केली.