‘पडघ्याचा आठवडा बाजार बंद करा’
पडघा, ता. २६ (बातमीदार)ः भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत भरणारा आठवडा बाजार बंद करण्याची मागणी एका समाजसेवी संस्थेने लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत पडघा यांना केली आहे.
पडघा ग्रामपंचायत हद्दीत शेरेकर, चिंबीपाड्याकडे जाणाऱ्या गावाच्या बाजूकडील मुंबई-नाशिक महामार्गालगत रविवारी आठवडा बाजार भरतो. या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी गृहोपयोगी सामान, भाजीपाला, कांदेविक्रीसाठी दुकानदार मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गर्दी धोकादायक असून महामार्गावरील भरधाव वाहनांचा ताबा सुटल्यास गर्दीत अपघात घडण्याची शक्यता असल्याची बाब वाहुली गावविकास प्रतिष्ठान (रजि.) या समाजसेवी संस्थेच्या लक्षात येताच संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे, सहसचिव गणेश मते यांनी बाजार बंद करण्याची मागणी सरपंच ग्रामपंचायत पडघा, तहसीलदार भिवंडी, पोलिस निरीक्षक पडघा पोलिस ठाणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.