नागपूर : पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जरीपटका भागात वास्तव्यास असलेल्या १८ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यांच्याकडून परतीचे अर्ज भरून घेत संपूर्ण माहिती शहर पोलिस आयुक्तालयाकडे पाठविली आहे. दरम्यान, गणेशपेठ पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून तपासणी सुरू आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, जरीपटका भागात दोन आठवड्यापूर्वीच पाकिस्तानहून आलेल्या १८ नागरिकांसंदर्भात जरीपटका पोलिसांना माहिती मिळाली. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या नागरिकांमध्ये अल्पवयीन मुलांचासुद्धा समावेश आहे. पाकिस्तानातून आलेले अनेक जण शहरात दीर्घ काळापासून वास्तव्यास असल्याची माहिती आहे. त्यांनी इथे व्यवसायही थाटले आहेत.
बंगले, कारही त्यांच्याकडे आहे. पहलगाम येथील घटना व त्यानंतर गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिस दल ॲक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसील, जरीपटका, कामठी, यशोधरानगर, गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत अनेक पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. पोलिसांकडून त्यांच्या पत्त्यावर जाऊन ओळख पटविली जात आहे.
चार पाकिस्तानी माघारीराज्य सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्यास सुरुवात झालेली आहे. असे असताना शहरातील चार नागरिकांनी चार दिवसापूर्वीच भारतातून प्रशासनाला न कळविता गेल्याची माहिती पुढे आली आहे. प्राथमिक माहिती नुसार नागपूर जिल्ह्यात अंदाजे ३ हजार ५०० पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहे. त्यापैकी २ हजार ४५८ पर्यटक किंवा इतर व्हिसावर असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यातील चार परत गेल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या नागरिकांच्या व्हिस्याची मुदत संपल्यानंतरही ते थांबल्याचा संशय आहे.
त्यामुळे त्यांची कागदपत्रे तपासत त्यांची पाकिस्तानात रवानगी केली जाणार आहेत. मात्र, प्रशासनातच थोडा अनिश्चितता असल्याची माहिती पुढे आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनीदेखील सर्व राज्यांना त्यांच्याकडील पाकिस्तानी नागरिकांची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच राज्य स्थानिक पोलिस प्रशासनाला.
आणि जिल्हा प्रशासनाला या पाकिस्तानी नागरिकांच्या वास्तव्याबद्दल निर्देश देईल. राज्याकडून निर्देश प्राप्त होताच प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्याची प्रक्रिया करणार असल्याच्या मुद्द्याला जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला आहे.
काश्मीरमधील बैसरन व्हॅली येथे गत मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी व्हिसाधारक नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरात जिल्हा पोलिस, विशेष शाखा आणि गुप्तचर यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
रहिवासी भागात गुप्त चौकशी, कागदपत्रांची पडताळणी आणि सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आली आहे. संशयित नागरिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे प्रशासनासमोर ओळखपत्र तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेचे आव्हान आहे, परंतु देशाच्या सुरक्षेसाठी ही पावले गरजेची असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पुढे आलेली आहे.