मुंबई - दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा आणि त्याच्या धर्माविषयी संशय आल्यास हनुमान चालिसा म्हणायला लावा, असा हिंदूंना जाहीर सल्ला देणारे राज्याचे मंत्री नीतेश राणे हे धार्मिक द्वेष पसरवत आहेत.
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे नीतेश राणे यांचे वक्तव्य निंदनीय आहे. धर्माचे राजकारण करणे हा नीतेश राणे यांचा धंदा बनला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
मंत्री नीतेश राणे यांनी दापोली येथील सभेत नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना आमदार रईस शेख म्हणाले, की पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेला सय्यद आदिल हुसेन शहा हा स्थानिक मुस्लिम होता. हल्ल्यानंतर स्थानिकांनी पर्यटकांना मोफत टॅक्सी, मोफत अन्न आणि मोफत निवासाची सोय उपलब्ध केली. हे सर्व मुस्लिमच आहेत.
‘ते’ शपथ विसरले!
भारतात धार्मिक राजकारणाला अजिबात थारा नाही. नीतेश राणे यांना मंत्रिपदाच्या शपथेचा विसर पडला आहे. त्यांच्या बेताल वक्तव्यांना त्यांच्या पक्षातूनही समर्थन मिळत नाही, असा टोलाही आमदार रईस शेख यांनी लगावला.