पाकिस्तानच्या अशांत वायव्येकडील पाकिस्तानी तालिबानच्या पूर्वीच्या बालेकिल्ल्यात असलेल्या सरकार समर्थक शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर सोमवारी (२८ एप्रिल) एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर ९ जण जखमी झाले. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर वाना येथे हा हल्ला झाला. असे स्थानिक पोलिस प्रमुख उस्मान वझीर यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर १६ जखमींना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान तालिबानचा जाहीरपणे विरोध करणाऱ्या शांतता समितीच्या कार्यालयाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट करण्यात आला. ही समिती स्थानिक लोकांमधील वाद सोडवण्यास देखील मदत करते.
उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात अफगाणिस्तानातून देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५४ दहशतवाद्यांना एका मोठ्या कारवाईत ठार केल्याचे लष्कराने अलीकडेच सांगितले होते, त्यानंतर हा बॉम्बस्फोट झाला. पोलिसांनी सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की शांतता समिती कार्यालयाची उद्ध्वस्त झाली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. या हल्ल्यासाठी पाकिस्तानी तालिबान जबाबदार असण्याची शक्यता आहे. पाक तालिबानला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणूनही ओळखले जाते. ते अनेकदा सुरक्षा दलांना आणि नागरिकांना लक्ष्य करते.
पाकिस्तानी तालिबान ही एक वेगळी संघटना असू शकते, परंतु त्यांचे अफगाण तालिबानशी अजूनही खूप चांगले संबंध आहेत आणि २०२१ मध्ये अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. त्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यासोबतच, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर बऱ्याच काळापासून अस्थिरतेचे वातावरण आहे.
या सगळ्यात, पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती सरकार आणि लष्करासाठी चिंतेचा विषय आहे. अनेक भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. २५ एप्रिल रोजी, क्वेट्टा येथे रस्त्याच्या कडेला झालेल्या एका घातक बॉम्ब हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने घेतली. बॉम्ब निकामी पथकाच्या वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यात रिमोट-कंट्रोल्ड आयईडीचा वापर करण्यात आल्याचे बीएलएने म्हटले आहे.