मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर देशात काही प्रमाणात धार्मिक वादही समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, दहशतवाद्यांनी पर्यटकांना जीवे मारताना आधी हिंदू-मुस्लिम हा भेद केल्याचं सांगण्यात येते. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्याचं काही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. त्यावरुन, आता मत-मतांतर आणि प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच, 'दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?' असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावरुन, आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांच्या प्रतिक्रियेवर टीकात्मक प्रत्त्युत्तर दिलंय.
'दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचं म्हणणं आहे की असं काही घडलंच नाही', असं यांनी म्हटलं. त्यावरुन, आता भाजप नेत्यांची जोरदार पलटवार केला आहे.
'काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती, भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचं दुःख वाटतंय. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगत आहेत. हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होतंय,' अशी प्रतिक्रिया भाजप आमदार यांनी दिली. तसेच, 'काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत. काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा... दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे जनतेला देखील चांगलंच समजलं आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय?' असा सवालही वाघ यांनी विचारला आहे.