सोमवारी राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. जयपूरमध्ये झालेला हा सामना १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गाजवला. त्याने शतकी खेळी करत सर्वांनाच चकीत केले. वैभवची प्रतिभा पाहून त्याचे सध्या क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या वैभवने सोमवारी केवळ ३५ चेंडूत शतक केले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.
इतकंच नाही, तर आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला आहे. त्याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. त्याने यशस्वी जैस्वालसह सलामीला राजस्थानसाठी १६६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने २१० धावांचे आव्हान सहज पार केले.
वैभवच्या शतकानंतर त्याचे मास्टर-ब्लास्टर आणि युवराज सिंग यांनीही कौतुक केले आहे. सचिनने लिहिले की 'वैभवचा निर्भीड दृष्टिकोन, बॅटचा वेग, लवकर लेंथ पकडणे आणि चेंडूमागची ऊर्जा हे त्याच्या शानदार खेळीचे सूत्र होते. त्याचा अंतिम निकाल: ३८ चेंडूत १०१ धावा. मस्त खेळलास!'
लिहिले, '१४ वर्षांचे असताना तुम्ही काय करत होता? या मुलाने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध पापणीही न लवता शॉट्स खेळले. वैभव सुर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा. अशा निर्भीड दृष्टीकोनाने खेळला. पुढच्या पिढीला चमकताना पाहून अभिमान वाटत आहे.'
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २०९ धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने ८४ धावा आणि जॉस बटलरने ५० धावा केल्या.
त्यानंतर राजस्थानने १५.५ षटकात २ बाद २१२ धावा करत सामना जिंकला. राजस्थानकडून वैभव शिवाय यशस्वी जैस्वालने ४० चेंडूत ७० धावांची खेळी केली. त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच कर्णधार रियान परागने ३२ धावा केल्या.