आज जगात असा समज आहे, की आध्यात्मिक असण्यासाठी तुम्ही कसलेही अन्न खाल्ले पाहिजे, कसेही कपडे घातले पाहिजे आणि कसेही जगले पाहिजे. हे खरे नाही. तुम्ही बाहेरून कसे दिसता याचा आध्यात्मिक असण्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही आतून कसे आहात याच्याशी ते संबंधित आहे.
तुम्ही जगात कुठेही असलात, तरी तुम्ही सध्या जे आहात त्यापेक्षा थोडे अधिक बनण्याचा प्रयत्न करत आहात. जेव्हा तुम्ही ते साध्य करता, तेव्हा तुम्हाला पुन्हा, आहात त्यापेक्षा चांगले बनण्याची इच्छा होते. तुमच्या आत असे काहीतरी आहे ज्यामुळे तुम्ही जसे आहात त्यावर समाधानी होणार नाही. तुमच्या माहितीत जे काही चांगले आहे, त्यानुसार तुम्ही थोडे अधिक बनण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुम्ही तुमची जागरूकता वापरुन त्याकडे पाहिले, तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल, की तुम्ही पैसा, मालमत्ता, प्रेम किंवा आनंद शोधत नाही; तुम्ही विस्तार शोधत आहात.
आता किती प्रमाणातला विस्तार तुम्हाला कायमचा समाधानी करेल? जर तुम्ही याकडे पाहिले, तर तुम्हाला स्पष्ट दिसून येईल, की तुम्ही अनंत विस्तार शोधत आहात. कशामुळे आपण भ्रमिष्टासारखे होत चाललोय, सतत विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय, अधिक संपादन करण्याचा आणि अधिक कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतोय याकडे नक्कीच थांबून पाहण्याची वेळ आली आहे, कारण आपण ‘वस्तूं’च्या मागे नाही आहोत. तुमच्या आत असे काही आहे ज्याला सीमा आवडत नाहीत, जे अमर्याद अनुभवाच्या शोधात आहे.
तुम्ही अमर्याद विस्तार, तुमच्या अनंत स्वरूपाच्या शोधात आहात; पण तुम्ही तिथे हप्त्यांमध्ये जात आहात. तुमचे लक्ष्य उत्कृष्ट आहे; फक्त पद्धत चुकीची आहे. हे गाडीतून चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. तुम्ही भौतिकाच्या माध्यमातून हा अमर्यादितपणा प्राप्त करू शकत नाही. भौतिक नेहमी मर्यादित सीमेसहित असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाणवते, की तो या भौतिक साधनांद्वारे अमर्यादितपणा प्राप्त करू शकत नाही, तेव्हा तो आध्यात्मिक बनतो. लक्ष्य तेच राहते; वाहनात बदल होऊन ते अधिक योग्य बनते.
भौतिकवाद आणि अध्यात्म ही दोन वाहने आहेत- जी स्वतःला सुधारण्यासाठी एकाच गोष्टीच्या शोधात आहेत. भौतिकवाद किंवा आध्यात्मिक असे काही नाही. तुम्हाला स्वतःला वेगळे करून फक्त तुमचे शरीर कार्यालयात नेणे शक्य आहे का?
ईशा योगाची मूलभूत तत्त्वे अशा प्रकारे तयार केली आहेत, की त्याच्यासाठी वेगळा कालावधी लागत नाही. हे तुमच्या जीवनालाच योग बनवण्याबाबतीत आहे. तुम्ही करत असलेले प्रत्येक कार्य, उदाहरणार्थ कार्यालयात जाणे, ही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते.