Virat Kohli-KL Rahul: 'प्लॅन केलेला मॅच जिंकवणार आणि तुला...', DC vs RCB सामन्यानंतर विराट - राहुलमध्ये काय बोलणं झालं?; VIDEO
esakal April 29, 2025 07:45 AM

रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. बंगळुरूने दिल्लीला त्यांच्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियमवर पराभूत केले आणि त्यांच्या घरात झालेल्या पराभवाची परतफेडही केली.

याआधी याच हंगामात १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पराभूत केले होते.

दरम्यान, ज्यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला होता, त्यावेळी केएल राहुलने ९३ धावांची नाबाद खेळी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्याने मैदानावर बॅट गोल फिरवत ठोकली होती आणि हे माझं मैदान असल्याचं दाखवलं होतं.

बंगळुरूत जन्मलेला आणि तिथेच वाढलेला केएल राहुलने या सेलीब्रेशन मागे कांतारा चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान त्याच्या या सेलिब्रेशननंतर रविवारी दिल्लीत होणाऱ्या याच दोन सामन्यावर सर्वांचे लक्ष होते.

कारण जसे दिल्लीकडून खेळणाऱ्या चिन्नास्वामी घरचे मैदान होते, तसेच बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराट कोहलीचे अरुण जेटली स्टेडियम हे घरचे मैदान होते. त्यामुळे तो पण केएल राहुलच्या त्या सेलिब्रेशनचे उत्तर देणार का याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती.

रविवारी त्या सेलिब्रेशचे उत्तर देण्याची संधी मिळेल असंही चित्र दिसत होतं. कारण दिल्लीने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा बंगळुरूकडून पाठलाग करताना विराटने कृणाल पांड्यासोबत शतकी भागीदारी करताना अर्धशतक पूर्ण केले होते. हे दोघे सामना जिंकवतील असंही चित्र होतं.

पण बंगळुरूला विजयासाठी १५ चेंडूत १८ धावांची गरज असताना विराट ४७ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. पण नंतर कृणाल पांड्याला साथ देण्यासाठी टीम डेव्हिड आला आणि त्यांनी बंगळुरूला सामना जिंकून दिला. कृणाल ४७ चेंडूत ७३ धावांवर नाबाद राहिला, तर डेव्हिड ५ चेंडूत १९ धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, या सामन्यानंतर विराटने केएल राहुलच्या जवळ जाऊन त्याच्या सेलिब्रेशनची नक्कल करून दाखवल्याचे दिसले होते, त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. पण त्यावेळी नेमकं त्यांच्यात काय बोलणं झालं, हे समजलं नव्हतं. पण आता दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्यातील संवाद काय झाला होता, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की बंगळुरूच्या विजयानंतर विराट केएल राहुलजवळ जाऊन त्याच्या 'हे ग्राऊंड माझं' सेलिब्रेशनची नक्कल केली आणि त्याला मिठी मारली. त्यावेळी त्यांच्यासोबत करुण नायर आणि देवदत्त पडिक्कल देखील होते.

त्यावेळी केएल राहुल विराटची नक्कल पाहून म्हणाला, 'मी आत्ता यांना हेच सांगत होतो की बरं झालं तू आऊट झालास.' त्यानंतर विराट हसून त्याला सांगतो की 'तुला माहितीये का मी काय विचार केलेला, मी सामना संपवेल आणि तु्झ्यासारखं सेलीब्रेशन करणार आणि मग तुला येऊन मिठी मारेल. यांना माहित नाहीये ना की मैदानाबाहेर आपण कसे आहोत.' दरम्यान हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रविवारीही केएल राहुलने दिल्लीसाठी बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. दिल्लीने २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या होत्या. बंगळुरूने १८.३ षटकात ४ विकेट्स गमवात १६५ धावा करून लक्ष्य पूर्ण केले आणि सामना जिंकला.

बंगळुरूचा हा सातवा विजय होता. त्यामुळे ते १० सामन्यांत ७ सामने जिंकून १४ गुणांसह सध्या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स ९ सामन्यांत ६ विजयांसह १२ गुण मिळवत चौथ्या क्रमांकावर आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.