इचल : मंत्री गिरीराज सिंह दौरा
esakal April 29, 2025 01:45 PM

ich284.jpg

60578

वस्त्रोद्योगासमोरील प्रश्न सोडविणार
वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह; वस्त्रोद्योजकांशी संवादावेळी ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. २८ ः ‘‘आमचे सरकार गप्पा मारणारे सरकार नाही. त्यामुळे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासमोर असलेल्या प्रश्नावर चर्चा करून ते भविष्यात निश्चितपणे सोडविण्यात येतील,’’ अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी दिली.
येथील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात वस्त्रोद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते. साध्या यंत्रमागाचे अपग्रेडेशन करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच त्यासाठी योजना आणणार आहे, असेही मंत्री गिरीराज सिंह नमूद केले.
यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, बिहारचे आमदार एम. एम. सर्वेश, सुनील पाटील उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी यंत्रमाग उद्योजक प्रतिनिधींनी विविध प्रश्नांची मांडणी केली. विशेषत: ‘जीएसटी’मधील त्रुटी, राज्य शासनाकडून विलंबाने मिळणारे अनुदान, साध्या यंत्रमागावरील उत्पादित कापडाचे आरक्षण, टफ योजना लागू करणे यांच्या मागण्यांचे निवेदनही मंत्री गिरीराज सिंह यांना देण्यात आले.
मंत्री गिरीराजसिंह म्हणाले, ‘‘इचलकरंजी फक्त धोतीसाठी प्रसिद्ध होते. पण जगातील सर्व ठिकाणी प्रत्येक शोरुमध्ये इचलकरंजीत तयार झालेला कापड जात आहे. त्यामुळे इचलकरंजीशिवाय देशाचा वस्त्रोद्योग पूर्ण होऊ शकत नाही. वस्त्रोद्योगासाठी लागू केलेल्या टफ्स योजनेतील अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे.’’
मंत्री सावकारे म्हणाले, ‘‘सर्वात जास्त सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. वस्त्रोद्योगाला स्वतः वीजनिर्मिती करुन ती स्वतःसाठी मोफत वापरता यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच विजेच्या संकटातून वस्त्रोद्योग मुक्त होईल.’’
खासदार माने यांनी वस्त्रोद्योग वाढीसाठी लॉजिस्टीक पार्कचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शहरातील साधे यंत्रमाग टिकण्यासाठी यावरच उत्पादित कापड शासनाने आपल्या विविध विभागांसाठी खरेदी करावे, अशी मागणी माजी आमदार हाळवणकर यांनी केली. यंत्रमाग उद्योगासाठी शासनाने पुढील २० वर्षांसाठी प्रतियुनिट ३ रुपये दराने सौरऊर्जा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी माजी आमदार आवाडे यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.