इंडियनन प्रीमियर लीग 2025 मध्ये गुजरात टायटन्सच्या विरोधात वैभव सूर्यवंशीने अत्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. अवघ्या 14 व्या वर्षीच स्फोटक खेळी करून वैभवने आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. भारताला नवीन स्टार सापडल्याचा आनंद प्रत्येक व्यक्ती व्यक्त करत आहे. वैभवच्या या कामगिरीवर त्याचे आईवडीलही प्रचंड खूश आहेत. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी तर बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी आणि राजस्थान रॉयल्सचे कोच राहुल द्रविड यांचे विशेष आभार मानले आहेत.
वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारी यांचं मनापासून आभार मानतो. वैभवमधील क्रिकेटपटू त्यांनी ओळखला आणि त्याला वारंवार संधी दिली. त्याच्या क्षमतेची नेहमीच कदर केली. त्यांच्या पाठबळाशिवाय हे शक्यच नव्हतं. तसेच राहुल द्रविड सरांचेही आम्ही आभारी आहोत. त्यांनीही वैभवची प्रतिभा ओळखून राजस्थान रॉयल्समध्ये खेळण्याची संधी दिली, असं संजीव सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या मातीत किती प्रतिभा आहे हे वैभवने आपल्या खेळाच्या माध्यमातून जगाला दाखवून दिलं आहे. आज बिहारला त्याच्यावर अभिमान वाटतोय. आम्हा संपूर्ण कुटुंबाला आणि बिहारच्या रहिवाश्यांना या क्षणाचा अभिमान वाटतोय, असं संजीव सूर्यवंशी यांनी म्हटलंय. वैभवने आपली कामगिरी अशीच सुरू ठेवावी ही देवाकडे प्रार्थना आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचं नाव उंचवावं. बिहारला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून द्यावा. आम्ही सर्वचजण त्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो, असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहे.
वैभवच्या कामगिरीबद्दल बिहारमध्ये जल्लोष केला जात आहे. बिहारच्या तरुणांनी वैभवच्या कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वैभवची ही कामगिरी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरेल. त्याने बिहारमधून येणाऱ्या नव्या प्रतिभेचा मार्ग खुला केला आहे, अशी प्रतिक्रिया बिहारचे तरुण व्यक्त केरत आहेत. समस्तीपूरच्या ताजपूरमध्ये वैभव राहतो. तो राजस्थान रॉयल्समधून खेळतोय. त्याने क्रिस गेलनंतर टी-20च्या फॉरमॅटमध्ये 35 चेंडूत जलदगतीने शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे समस्तीपूरसहीत संपूर्ण बिहारमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तेजपूरमध्ये तर तरुणांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. त्याच्या चाहत्यांनी केक कापून आणि आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. अनेकांनी तर वैभवच्या जयजयकाराच्या घोषणाही दिल्या.